लूलिया वंतूर हे नाव भारतीयांसाठी काही नवे नाही. अभिनेता सलमान खानची बहुचर्चित प्रेयसी म्हणून लूलिया चर्चेत असते. पण सध्या मात्र सलमान आणि लूलियाच्या नात्याच दुरावा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही काळासाठी भारतात राहिलेल्या लूलियाने मायदेशी जाण्यास प्राधान्य देत थेट रोमानिया गाठले आहे. अभिनेत्री, सुत्रसंचालक, मॉडेल म्हणून ओळखली जाणारी लूलिया वंतूर जेव्हा जेव्हा सलमान खानसोबत दिसली तेव्हा तेव्हा प्रसारमाध्यमांनी या विषयाला उचलून धरले होते. लूलिया आणि सलमान खान लवकरच विवाहबद्ध होणार अशी चर्चा असतानाच अचानक त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे चाहत्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला.
लूलियाने रोमानियातील एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आणि सलमानच्या नात्यात दुरावा का आला हे स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मुलाखतीदरम्यान, ‘मी हिंदीमध्ये गाणे गाण्यास सुरुवात केली होती. मी गाणे शिकतही होती. भारतात ती पद्धत इथल्यापेक्षा वेगळी होती खरी. पण, मला त्याचीही सवय झाली होती. तिथे परंपरा, मानसिकता, माणसं सारं काही वेगळं आहे. ‘प्रायव्हसी’ तर फारच कमी आहे. तिथे एकाच घरात अनेकजण राहतात’, असे लूलिया म्हणाली. त्यामुळे तिच्या बोलण्याचा सूर मात्र काही वेगळेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. तिने ही तडजोड सलमानसाठी तर केली नव्हती ना? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पण, निदान भारतात असेपर्यंत लूलियाने सलमान आणि त्याच्या कुटुंबियांसोबत खूप चांगला वेळ व्यतित केला होता हे खरे.
दरम्यान, अभिनेता सलमान खान त्याच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु असून चित्रपटाचा बराचसा भाग चित्रीत झाला आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये १९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कथानक साकारलेले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2016 8:11 pm