प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या ‘बिग बॉस’मधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. “मराठी भाषेत माझाशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असं खळबळजन वक्तव्य त्याने केलं. या वक्तव्यामुळे सध्या त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. महाराष्ट्रात राहून देखील त्याला मराठी भाषेचा इतका राग का येतो? असा संतप्त सवाल केला जात आहे. शिवाय काही नेटकरी तर त्याला बिग बॉसमधून बाहेर काढावं अशीही मागणी करत आहे. परंतु हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? जान कुमारनं असं वादग्रस्त वक्तव्य का केलं?

अवश्य पाहा – महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते?; महेश टिळेकरांचा जान कुमारला संतप्त सवाल

अवश्य पाहा – IPLसाठी किंग खानच्या ‘सुहाना’ची खास तयारी; पाहा तिचे व्हायरल झालेले फोटो

जान कुमार सानू बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये सहभागी झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री निक्की तंबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत संभाषण करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी जान कुमारने तिला मराठी बोलण्यापासून रोखलं. शिवाय मराठी भाषेवर टीके देखील केली. मला मराठी भाषा आवडत नाही. माझ्याशी मराठी भाषेमध्ये बोलू नकोस. मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणत त्याने निक्की समोर आपला संताप व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मराठी भाषिक या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.

मराठी प्रेक्षकांसोबतच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. “जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,” असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला.