बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. यावेळीदेखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून बृन्मुंबई महानगरपालिकेचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले. बीएमसीकडून प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे त्यांनी आभार मानले होते. मात्र त्यांचं ट्विट चित्रपट निर्माते अशोक पंडित यांना फारसं रुचलं नसून त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर टिकास्त्र डागलं आहे. ‘सर, तबलिगींवर तुम्ही कधी व्यक्त व्हाल?’ असा खोचक सवाल अशोक पंडित यांनी विचारला आहे. त्यामुळे सध्या या दोघांमध्ये ट्विटर वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

करोना विषाणूच्या वाढता संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तसंच देशातील प्रत्येक नागरिकाला घरात राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवस-रात्र काम करत असून बीएमसीकडून प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करुन पाहत आहे. त्यामुळे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून बृन्मुंबई महानगरपालिकेचे ( बीएमसी) आभार मानले. मात्र त्यांचं ट्विट पाहिल्यानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अख्तर यांनी टोला लगावला आहे. मात्र अशोक पंडित यांनी टोला लगावल्यानंतर जावेद अख्तर यांनीदेखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी ट्विट करत बीएमसीचे आभार मानले होते. “मुंबई बीएमसीला माझा सलाम. बीएमसीमुळे आपल्या इथे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक करोना चाचणी करण्यात आली आहे. प्रत्येकाची करोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे करोना रुग्णांची माहितीही पटकन मिळत आहे. तसंच करोना रुग्ण आढळल्यानंतर त्याला लगेचच उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. त्यामुळे करोना विरुद्ध लढा देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी बीएमसीचे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. धन्यवाद बीएमसी”, असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं.

त्यांचं हे ट्विट पाहून अशोक पंडित यांनी त्यांनी खोचक सवाल विचारत, अजूनपर्यंत तबलिगींवर ट्विट का केलं नाही? असा प्रश्न विचारला आहे.

“सर, बीएमसीकडून करण्यात येत असलेल्या कार्याची तुम्ही प्रशंसा केली यांचं मला कौतूक आहे. परंतु, तबलिगी जमातीचं काय? मी वाट पाहतोय, तुम्ही त्यांच्यावर कधी व्यक्त व्हाल. मला खात्री आहे तुम्ही मुराबादमध्ये जे घडलं त्यांचे व्हिडीओ वगैरे पाहिले असतील. मात्र अशा प्रकरणात तुम्ही शांत कसे काय?”, असा सवाल अशोक पंडित यांनी विचारला.

अशोक पंडित यांनी विचारलेल्या प्रश्नावर जावेद अख्तर यांनीही रोखठोक उत्तर दिलं आहे. अशोक जी, जे काही आहे ते उघडपणे बोला. तुम्ही मला कित्येक वर्षांपासून ओळखता, तुम्हाला असं वाटतं मी सांप्रदायिक आहे? अन्य कोणी विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती. मात्र तुम्ही माझे मित्र आहात. तुम्हाला ठाऊक नाही का?, तबलिगी असो किंवा त्याप्रमाणे अन्य कोणतीही हिंदू किंवा मुस्लीम संस्थांविषयी माझं काय मत आहे, असं जावेद अख्तर म्हणाले.

जावेद अख्तर यांचा पलटवार पाहून अशोक पंडित यांनीही उत्तर दिलं आहे. “सर मी तुम्हाला ओळखतो आणि मनापासून तुमचा आदरही करतो.त्यामुळेच या गोष्टीमुळे संभ्रमात पडलो होतो. तबलिगी जमातीने जे काही केलं, त्यावर तुम्ही जाहीरपणे व्यक्त झाला नाहीत. जर काही चुकीचं घडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणं ही शिकवण तुमच्याकडूनच मिळाली आहे. मात्र या लोकांनी जे काही केलं त्यावर तुम्ही मौन बाळगलं याची खंत वाटते”.

दरम्यान, दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमात मर्कझच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाली. यापैकी काहींना उपचारासाठी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या रुग्णांनी डॉक्टर आणि तिथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. इतकंच नाही तर एका डॉक्टरला प्रचंड मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.