नृत्यकौशल्याच्या व अभिनयाच्या अचूक टायमिंगने रसिकांना मनोरंजनाचा आनंद देणारा अभिनेता जावेद जाफरी आता मऱ्हाठमोळं रॅपसाँग गात आजच्या तरुणाईला बदल घडवायची जाणीव करून देणार आहेत. ‘युथ’ या आगामी मराठी चित्रपटासाठी हे रॅपसाँग त्याने गायलं आहे. रॅपसाँगला दिलेला हिंग्लिश शब्दांच्या तडक्यामुळे ते अधिकच परिणामकारक झालं आहे. ‘बंद कर राग डोक्यात गेली आग’ असे बोल असलेल्या या रॅपसाँगमधून आजची राजकीय परिस्थिती दर्शवत तरुणाईला बदल घडवायची जाणीव करून दिली आहे. जावेद जाफरी यांनी मराठीत गायलेलं हे पहिलंच मराठी रॅपसाँग आहे. आपली आजची परिस्थिती ही खरच विचार करायला लावणारी आहे. आजच्या तरुणाईने विचार करत ही परिस्थिती बदलावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. या रॅपसाँगच्या माध्यमातून हा विचार तरुणाईपर्यंत पोहचवता येणार असल्याने या रॅपसाँगला मी होकार दिल्याचं जावेद जाफरी म्हणाला. विशाल-जगदीश यांनी शब्दबद्ध केलेल्या या रॅपसाँगला त्यांचच संगीत लाभलं आहे.
व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित ‘युथ’ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणाऱ्या या जगात तरूणांचा सहभाग सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन ‘युथ’ सिनेमामधून पहाता येणार आहे. राकेश कुडाळकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षयम्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले, सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. २० मे ला ‘युथ’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.