|| भक्ती परब

मी जर लिहिताना दोन शब्दांमध्येसुद्धा अंतर देतो, तर मग तिला तिची स्पेस देणार नाही का.. प्रेमात समोरच्याला उपकार वाटेल इतका त्याग करू नये.. अशा संवादांनी सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचा प्रोमो गाजतो आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर अशा चार नावाजलेल्या कलाकारांना घेऊन छोटय़ा पडद्यावर येणारी ही मालिका जणू एखादा चित्रपटच टीव्हीवर पहावा इतक्या भव्या स्वरूपात दाखल होते आहे. यानिमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशी बऱ्याच काळानंतर मालिकेत काम करताना पाहायला मिळणार आहे, तर अमृता खानविलकर पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर मालिकेत काम करणार आहे..

Civil Law in Constitution is equal or same
नागरी कायदा… समान की एकच?
Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

चित्रपटात रमल्यानंतर आता पुन्हा मालिकेत येण्यामागचं कारण स्पष्ट करताना स्वप्निल जोशी म्हणाला, ‘जिवलगा’ ही मालिका असली तरी ती तशी वाटत नाही आणि हीच त्यामागची कल्पना होती. मालिका आणि चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग आता वेबसीरिजकडे वळतोय, ओटीटी माध्यमांमध्येही स्पर्धा आहे, आधी फक्त एका वाहिनीच्या मालिकांची दुसऱ्या वाहिनीच्या मालिकांशी स्पर्धा होती. आता माध्यमांचीच आपापसात स्पर्धा आहे.

त्यामुळे माध्यमांच्याही पलीकडे जाऊ न प्रेक्षकांना आपलासा वाटेल, असा आशय सादर करायचा होता. मालिकेची गोष्ट सतीश राजवाडेने लिहिलीय. ही प्रेमकथा आहे. सर्वसाधारण प्रेमकथेत कसं असतं, त्यांच्या लग्नात समस्या निर्माण झाल्या की गोष्ट संपते. आमची गोष्ट इथूनच सुरू होते. म्हणूनच ही गोष्ट मला रोमांचक वाटली. त्यात पुढे काय घडणार याची उत्सुकताही वाटते त्यामुळे ती गोष्ट सांगावाशीही वाटते. चित्रपटात व्यग्र असल्याने मालिकेसाठी वेळ कसा देणार, हा प्रश्न असतो मात्र ही मर्यादित भागांची मालिका आहे. त्यामुळे इतरवेळी जसं मालिकेच्या कथानकात पाणी घालून ती लांबवली जाते तसंही काही होणार नाही.

स्वप्निलचं छोटय़ा पडद्याशी जुनं नातं आहे. अगदी ‘श्रीकृष्णा’ मालिकेपासून.. त्यावर तो लगेच उत्तरतो, मी टीव्ही प्रॉडक्ट आहे आणि मला याचा आनंद, अभिमान दोन्ही आहे. मी आज जो काही आहे, मला मिळालेलं नाव, पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान ही दूरचित्रवाणीची देणगी आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘कोण होईल मराठी करोडपती’, ‘फू बाई फू’चे काही पर्व अशा कार्यक्रमातून मी वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर आलो. सूत्रसंचालक, परीक्षक आणि मुख्य नायक अशा विविध रूपांत प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं. मालिका मर्यादित भागांच्या असाव्यात अशी संकल्पनाच रुजली नव्हती तेव्हा आम्ही ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ केली होती. ती मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, आजही त्या मालिकेचे दाखले दिले जातात. दूरचित्रवाणीवर नेहमीच मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आणि मालिकांमध्ये काम करायची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

या मालिकेच्या निमित्ताने एक वेगळा चमू जमून आला आहे. सिद्धार्थ चांदेकर १० वर्षांनी तर मी ९ वर्षांनी मालिका करतोय आणि अमृता खानविलकरची ही पहिली मालिका आहे. असे आम्ही तिघे या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे मजा आली. या मालिकेच्या ट्रेलरचं लेखनही इतकं सुंदर झालं होतं की ते कधी शूट होतंय, याची उत्सुकता लागून राहिली होती. त्याआधी आम्ही कलाकारांनी प्रोमो शूट केले होते, दूरचित्रवाणीवरील मालिकेतील नायक एक लेखक असल्याचे यात दाखविले आहे. मी पहिल्यांदाच लेखकाची भूमिका करतोय. अमृताची व्यक्तिरेखा उद्योजिकेची आहे. सगळ्यांच्या व्यक्तिरेखा छान लिहिल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्या साकारताना मजा आली. आम्ही चौघांनी आपापली वेगळी ऊर्जा त्या व्यक्तिरेखेत आणली. ट्रेलरमुळे या मालिकेचं वेगळेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं आहे. एक वेगळा प्रयोग म्हणूनच ते या मालिकेकडे पाहतील,’ असा विश्वासही स्वप्निलने व्यक्त केला.

मालिकेतील ‘काव्या’च्या भूमिकेविषयी अमृता खानविलकर म्हणाली, काव्या ही आजच्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा आहे. तिने स्वबळावर स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं असून ती करिअरला प्राधान्य देणारी आहे. अतिशय जिद्दीने काम करणारी, जिद्दीने सगळं मिळवणारी ती मुलगी आहे. प्रत्येक स्त्रीला तिचं एक जग निर्माण करावं असं वाटत असतं, तसं तिने केलं पाहिजे. लग्न झालं की बस्स.. या विचारसरणीला बाजूला सारून स्वत:चं अस्तित्व स्त्रीने निर्माण केलं पाहिजे हा विचार लोकांमध्ये रुजतो आहे. ही अस्तित्व निर्माण करण्याची लढाई प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाची आहे.

चित्रपट, वेबसीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमांत व्यग्र असताना या मालिकेसाठी वेळेची जमवाजमव कशी केली, याबद्दल बोलताना अमृताने सांगितले, मालिकेच्या चित्रीकरणाच्या तारखा देताना मला ‘आयरिस प्रॉडक्शन’ने मोकळीक दिली. माझ्या वेळा जुळवून घेतल्या, त्यामुळे चित्रीकरणाला कुठलाही अडथळा आला नाही. एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण करतोय, असंच सेटवर वातावरण असायचं. काव्याचा संपूर्ण लूक मी डिझाईन केला, मला पाहिजे होतं तसं चमूने मला करू दिलं. तिचे दागिने, तिच्या साडय़ांचे रंग, पॅटर्न हे सगळं निवडण्यात मी सहभाग घेतला. भूमिका करताना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे आनंदाने भूमिका साकारली.

मालिका असल्यामुळे ‘टीआरपी’ची गणितं आणि इतर मालिकांशी स्पर्धा होणारच. ती असलीच पाहिजे, कारण स्पर्धेमुळेच चांगल्यात चांगला आशय पाहायला मिळतो. आमची स्पर्धा आमच्याच मालिकेच्या पहिल्या भागाशी असेल. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग आणि त्यानंतर येणारे किती भाग उत्कंठावर्धकपणे सादर करू शकतो, हे आव्हान आहे. या मालिकेनंतर श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मोगरा फुलला’ हा माझा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्या चित्रपटातही प्रेक्षकांना मी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.   – स्वप्निल जोशी

चित्रपटासाठी संवाद हळू आवाजात बोलायचे असतात. कारण नंतर डबिंग होणार असतं. पण मालिकेचं तसं नसतं. ही गोष्ट माझे सहकलाकार स्वप्निल आणि सिद्धार्थ यांनी मला लक्षात आणून दिली. सेटवर ते दोघे जणू काही माझे शिक्षकच झाले होते. प्रेमाची सर्व बंधनं तोडणारी किंवा गुंतागुतींचं नातं काय असतं हे दाखवणारी ही मालिका आहे.    – अमृता खानविलकर