रुपेरी पडद्यावरील दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपट रसिकांच्या मनात घर निर्माण करणारे अभिनेते आपल्या क्षेत्रात कमालीची उंची गाठतात. ही उंची गाठत असताना ते पडद्यावर साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या भावनांचे विविध पैलू लीलया सादर करतात. चित्रपटात विनोदी, गंभीर, भावनात्मक इत्यादी दृश्य वठवताना प्रेक्षकांनादेखील त्यात एकरूप करून घेतात. असे कलाकार कायम वैविध्यपूर्ण भूमिकांना प्राधान्य देताना दिसतात. यातीलच एक नाव शाहिद कपूरचे आहे. शाहिदने ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘कमिने’ आणि अलिकडच्या काळातील ‘कबीर सिंह’ चित्रपटातून हे सिद्ध केले आहे.

‘कबीर सिंह’ चित्रपटातील त्याने साकारलेल्या मुख्य भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले. चित्रपटाने ‘बॉक्स ऑफीस’वर देखील उत्तम कामगिरी केली. चित्रपटाची कथा कबीर सिंह या मुख्य पात्राभोवती फिरत असून, त्याच्या भावनांचे विविध पैलू चित्रपटात दर्शविण्यात आले आहेत. शाहिदलादेखील या चित्रपटामुळे हटके भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्याने कबीर सिंहच्या भावनांचे चढ-उतार उत्तमरीत्या दर्शविले आहेत. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्याने हे पात्र पडद्यावर जिवंत केलं आहे.

चित्रपटात कियारा अडवाणी शाहिदची सह-अभिनेत्री असून, तिने प्रितीची व्यक्तिरेखा साकारली आहे. जेव्हा चित्रपट शेवटाकडे येतो, तेव्हा एका दृश्यात आपण गरोदर असल्याचे प्रिती कबीरला सांगते. हे भावनात्मक दृश्य खूप छान प्रकारे चित्रित करण्यात आले आहे. हे दृश्य साकारताना शाहिदने अभिनयाची विशेष खोली गाठली आहे. ह्या हृदयस्पर्शी दृश्यात कियाराला मिठी मारताना शाहिद खरोखरीच रोमांचित झाला आणि तो शहारला.

याविषयी ट्विटरवरून पोस्ट करत शाहिदच्या एका चाहतीने त्याच्या अभिनयाचे कौतूक करत ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. हे दृश्य साकारताना आपल्यालादेखील याची जाणीव झाली नसल्याचे सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याचे निदर्शनास आणून दिल्याची प्रतिक्रिया शाहिदने दिली आहे.

आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांना रोमांचित करणारे कलाकार व्यक्तिरेखा वठवतांना भूमिकेत समरस होऊन उत्कटपणे दृश्य साकारत व्यक्तिरेखा जिवंत करतात याचेच हे उदाहरण आहे.