सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने खोटे चाहते गोळा करणाऱ्या बॉलिवूड संगीतकार आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया उर्फ बादशाहवर सध्या जोरदार टीका होत आहे. खोट्या व्हूजसाठी त्याने तब्बल ७५ लाख रुपये मोजले होते असं म्हटलं जात आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाद्वारे त्याची चौकशी देखील केली जात आहे. दरम्यान या प्रकरणावरुन गायक कैलाश खेर यांनी बादशाहवर निशाणा साधला आहे. एवढे पैसे खोट्या चाहत्यांवर खर्च करण्याऐवजी लहान मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले असते तर खरे चाहते गोळा करता आले असते, असा टोला त्यांनी लगावला आहे.
अवश्य पाहा – कुंडली न जुळल्यानं अभिनेत्रीने मोडलं लग्न
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत कैलाश खेर यांनी बादशावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “खरा कलाकार लोकप्रियता आणि सेलिब्रिटी स्टेटसचा फारसा विचार करत नाही. तो आपल्या कलेच्याप्रती प्रामाणिक असतो. जे कलाकार प्रामाणिकपणे आपली कला सादर करतात त्यांना असे खोटे लाईक्स आणि फॉलोअर्स गोळा करण्याची गरज भासत नाही. परंतु अश्लिल गाणी तयार करणाऱ्या कलाकारांवर मात्र खोटे चाहते गोळा करण्याची वेळ येते. त्यांनी हे लाखो रुपये जर समाजाच्या कल्याणासाठी, अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी, गरीबांच्या रोजगारासाठी वापरले तर त्यांना देखील खरे चाहते गोळा करता येतील.”
अवश्य पाहा – महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत घोटाळा केल्याप्रकरणी अभिनेत्रीला तुरुंगवास
जाहिराती मिळवण्यासाठी बनावट चाहते निर्माण करणे, कृत्रिमरित्या चाहत्यांची संख्या वाढविणे, अशा बनावट चाहत्यांची खरेदी-विक्रीचा घोटाळा विशेष पथकाने उघड केला होता. या प्रकरणी काही प्रसिद्ध सोशल मिडीया मार्केटींग कं पन्यांच्या प्रमुखांसह बॉलीवूडमधील प्रभावशाली व्यक्तींची चौकशी सुरू आहे. तसेच अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या इन्स्टाग्राम खात्यांची तांत्रिक झाडाझडती या पथकाकडून सुरू आहे. एखाद्याच्या खात्यावर चाहत्यांची संख्या, प्रतिसादाचे प्रमाण (लाईक, व्हयू) अचानकपणे वाढले असेल तर त्या व्यक्तीला पथक चौकशीसाठी बोलावते. त्यातूनच बादशहाला समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गुरुवारी तीन तास त्याच्याकडे चौकशी के ली गेली.पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे आणि प्रकाश होवाळ या अधिकाऱ्यांनी बादशहासमोर सुमारे २५० प्रश्न ठेवले. त्यापैकी निम्म्या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. शुक्रवारी उर्वरित प्रश्नांची उत्तरे मिळवली जातील, असे सांगण्यात आले. बादशहाच्या इन्स्टाग्राम खात्यांवर काही ठराविक दिवशी चाहत्यांची संख्या अचानकपणे वाढली. तसेच त्याने जाहीर केलेल्या एका ध्वनिचित्रफित साडेसात कोटी व्यक्तींनी पाहिली, असेही सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2020 1:57 pm