बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असतानाच अभिनेत्री नेहा धुपियानेदेखील अंगद बेदीबरोबर विवाहगाठ बांधली. त्यामुळे सध्या संसारात रमलेली नेहा लवकरच ‘हेलीकॉप्टर ईला’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नेहाने अभिनेत्री काजोलचं कौतुक केल्याचं दिसून येत आहे. खरं तर बी टाऊनमध्ये फार कमी असे कलाकार आहेत जे अन्य दुसऱ्या कलाकारांचं जाहीर कौतुक करतात.मात्र नेहाने काजोलचं कौतुक केल्याचं पाहायला मिळतं आहे.

काजोल ‘हेलीकॉप्टर ईला’ या चित्रपटामधून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाविषयी बोलताना नेहाने काजोलवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. ‘चित्रपटाची खरी रंगत कलाकारांचा अभिनय आणि कथानक यामुळे वाढत असते. मात्र काही कलाकार असे असतात की ज्यांच्या केवळ येण्यामुळेच चित्रपट सुपरहिट होतो. त्यातलच एक नाव घ्यायचं झालं तर काजोल. काजोलच्या केवळ येण्यामुळेच चित्रपटाची रंगत वाढते. तिच्याकडे बघून एकदाही असं वाटत नाही की ती बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये परतली आहे. तिच्या याच अभिनय शैलीमुळे ती आजही चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवत आहे. त्यामुळे कलाकार जरी काळाच्या ओघात गेला तरी तो विस्मृतीत जात नाही’, असं नेहा म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, काजोलचा अभिनय पाहण्यासारखा आहे. तिच्याकडे पाहून एकदाही असं वाटत नाही की ती बॉलिवूडपासून काही काळ लांब होती.तिचा अभिनय कायम नैसर्गिक वाटत असतो. तिच्यात अभिनयाची जी एनर्जी आहे ते पाहून साऱ्यांनाच अचंबित व्हायला होतं. विशेष म्हणजे सेटवरही सतत हसतखेळत असल्यामुळे तिच्याबरोबरच्या सहकार्यांमध्येही एक सकारात्मकता निर्माण होते.

दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘हेलीकॉप्टर ईला’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रदीप सरकार यांनी घेतली असून निर्मिती अजय देवगण, जयंतीलाल गडा यांनी केली आहे.