अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई महापालिकेविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. बुधवारी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी जे बांधकाम अनधिकृत आहे, ते अधिकृत करण्यासाठी कंगनाने मुंबई पालिकेकडे तसा रितसर अर्ज केला आहे.

मुंबईतील खार येथे कंगनाच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका मुंबई महानगर पालिकेने ठेवला होता. तसंच याप्रकरणी त्यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यामुळे कंगनाने याविरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, आता कंगनाने स्वत: ही याचिका मागे घेतली आहे.

या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे अर्ज करण्यास कंगना तयार असल्याचे तिचे वकील बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच ती याचिका मागे घेण्यास तयार असल्याचेही सांगितले. मात्र तोपर्यंत पालिकेने कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश पालिकेला देण्याची विनंतीही कंगनातर्फे करण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण?

खार वेस्ट येथील १६ नंबर रोडवरील एका इमारतीत कंगना रणौत राहत असून या इमारतीत तिचे तीन फ्लॅट आहेत. मात्र, या फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार २०१८ मध्ये बीएमसीमध्ये करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर बीएमसीने कंगनाला नोटीस बजावली होती. तसंच २६ मार्च २०१८ मध्ये तिच्या घराची पाहणी केली होती. त्यानंतर कंगनाला BMC under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटिस बजावण्यात आली होती.