अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून या प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. सीबीआयने रियाच्या मोबाइल फोनमधून तिने डिलिट केलेले व्हॉट्स अॅप चॅट पुन्हा प्राप्त केले आहेत. यात अंमली पदार्थांबाबतही काही संवाद आहेत. या माहितीवर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. अंमली पदार्थांची चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कोणत्याच कलाकाराला काम करण्याची परवानगी देऊ नये, अशी विनंती तिने केंद्र सरकारकडे केली आहे.

कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही काळात ती सातत्याने बॉलिवूड कलाकारांवर टीका करत आहे. यावेळी तिने अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. या सर्व कलाकारांची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे करोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कुठलाही कलाकार शूटिंगला जाऊ शकत नाही. अगदी त्याच प्रमाणे अंमली पदार्थांची चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कोणत्याच कलाकाराला काम करण्याची परवानगी मिळता कामा नये. यासाठी सरकारने नवे कायदे तयार करावे. व अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करावी.”

सुशांत प्रकरणाला आलं वेगळं वळण

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.