बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन याने कोलकातामधील काली पूजेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर काली पूजेला हजेरी लावत शाकिबने मुस्लीम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप करत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शाकिबला ठार मारण्याची धमकी दिली जात होती. शाकिबने या प्रकरणी माफी मागितली. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने ट्विटरवर एका न्यूज पोर्टलचे ट्विट रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्ही इतके का घाबरता मंदिरांना? काही तरी कारण असेल? उगाच कोणी इतके घाबरत नाही. आम्ही संपूर्ण आयुष्य मशिदीमध्ये घालवले तरी देखील आमच्या मनावर कोरलेले रामाचे नाव कोणी मिटवू शकत नाही. आपल्या प्रार्थनेवर विश्वास नाही की आपलाच भूतकाळ मंदिराकडे आकर्षित करत आहे हे स्वत:ला विचारा…’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

शाकिबला येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सिल्हेटचा रहिवासी असलेल्या मोहसीन तालुकदार याने शाकिबला ठार मारण्याची धमकी दिली. काली पूजेला हजेरी लावत शाकिबने मुस्लीम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्याने केला होता. गरज पडल्यास सिल्हेटहून ढाक्यापर्यंत चालत येईन अशी धमकीही फेसबुक लाइव्हमधून शाकिबला दिली होती.

काय म्हणाला शाकिब?

“मी पूजेच्या कार्यक्रमासाठी केवळ २ मिनिटं व्यासपीठावर होतो. लोकांचा असा समज झाला की मी त्या पूजेच्या कार्यक्रमाचे उद्धाटन केले. पण मी असं काहीही केलेलं नाही. मी मुस्लीम आहे त्यामुळे अशाप्रकारची कृती नक्कीच करणार नाही. मी तिथे जायलाच नको होतं. झालेल्या गैरसमजाबद्दल मला माफ करा. मी नेहमी इस्लाम धर्माचं पालन केलं आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो”, असे शाकिबने ऑनलाइन फोरमशी बोलताना स्पष्ट केले.