बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. ट्विटरवरील कंगनाच्या वेगवेगळ्या विधानांमुळे तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. तर सोशल मीडियावरुनही निशाणा साधणाऱ्यां ट्रोलर्सना उत्तर द्यायला कंगना मागे हटत नाही. नुकतचं कंगनाने एक ट्विट केलं आहे. मात्र यावेळी तिने एक व्हिडीओ शेअर केलाय.

कंगना सध्या तिच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एकाच वेळी ती अनेक प्रोजेक्टवर काम करतेय. अशातही कंगनाने तिच्या कुटुंबासाठी वेळ काढत एक महत्वाचं काम हाती घेतलंय. कंगना तिच्या भाऊ आणि वहिनीच्या घराची सजावट करतेय. कंगनाने स्वत: सजावट करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत कंगना एक सुंदर लाकडी कपाट सजवताना दिसतेय. या कपाटात पद्धतशीर पुस्तकं मांडण्यात आली आहेत. त्याचसोबत अनेक शोभेच्या वस्तूंनी कपाट सजवलं गेलंय. या कपाटाची शोभा वाढवण्यासाठी कंगना त्यात रोपं ठेवत असल्याचं व्हिडीओत दिसतंय.

” स्क्रिप्ट आणि एडिटींगच्या सेशन नंतर मी माझ्या भाऊ आणि वहिनीच्या घरी पोहचले आहे. हे घर सजवण्याचं काम मी हाती घेतलंय. मध्य रात्रीपर्यंत मी पूर्ण सेट करणार आहे. नऊ हात असलेली स्त्री ही काही दंतकथा नाही प्रत्येक स्त्री ही तशीच आहे” अशं कॅप्शन कंगनाने या व्हिडीओला दिलंय.काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिच्या मूळ गावी मनालीमध्ये तिचं पहिलं कॅफे आणि रेस्टॉरंट सुरु करणार असल्याचं सांगितलं होतं. यासाठी तिने जमीन खरेदी केली असून सोशल मीडियावर तिने तिच्या नव्या प्रोजेक्टचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

तर दुसरीकडे ईमेल प्रकरणात हृतिक रोशनला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. याप्रकरणी 27 फेब्रुवारीला हृतिकची चौकशी होणार असून कंगनाला देखील चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे याप्रकरणात कंगनाच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.