गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत सातत्याने चर्चेत येत आहे. शेतकरी आंदोलनाला विरोध करत कंगनाने आतापर्यंत अनेकांवर टीकास्त्र डागलं आहे. यामध्येच आता तिने तिच्या टीकेची तोफ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे वळवली आहे. दिल्लीतील रिंकू शर्मा हत्येप्रकरणी तिने भाष्य केलं आहे.

कंगनाने ट्विटरवर अरविंद केजरीवाल यांचं २०१५ मधील एक ट्विट शेअर केलं आहे. सोबतच तिने खोचक टीका केली आहे. “केजरीवालजी, मला आशा आहे की,तुम्हीदेखील रिंकू शर्माच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना पाठिंबा द्या. तुम्ही एक राजकारणी आहात”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.


दरम्यान, कंगनाचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी तिलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल जरी दिल्लीचे मुख्यमंत्री असले तरीदेखील तेथील दिल्ली पोलीस राज्याच्या नव्हे, तर केंद्राच्या अधिकाराखाली येतात. मग अशा परिस्थितीत तू केंद्र शासनाला काही प्रश्न विचारणार की नाही, असा उलट प्रश्न नेटकऱ्यांनी कंगनाला विचारला आहे.

काय आहे रिंकू शर्मा प्रकरण?

दिल्लीमध्ये २५ वर्षीय रिंकू शर्मा या तरुणाची त्याच्याच शेजारी राहणाऱ्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगलपुरी परिसरात ही घटना घडली. पीडित रिंकू शर्मा हा भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. हल्ल्यात जखमी झालेल्या रिंकू शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपी नसरुद्दीन, इस्लाम, झाहीद आणि मेहताब यांना अटक करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, “रिंकू आणि शेजारी राहणाऱ्या नसरुद्दीन यांच्यात काही धार्मिक वक्तव्यावरुन वाद काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी रात्री नसरुद्दीन आणि इतर तिघे जबरदस्ती घरात घुसले आणि रिंकूच्या पाठीवर चाकूने वार केला”. पोलिसांनी व्यवसायिक वादातून हत्या झाल्याची माहिती दिली असताना विश्व हिंदू परिषद मात्र राम मंदिरासाठी निधी जमा करण्यावरुन हत्या झाल्याचा दावा करत आहे.