कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. कपिलचा शो सुरु होण्यापूर्वीच कपिल आणि त्याचा पूर्वीचा सहकलाकार सुनील ग्रोवर यांच्यामधील वाद समोर आला होता. सुनील या नव्या भागात सहभागी होणार की नाही याविषयी चर्चा रंगल्या होत्या. मात्र माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी या शोचा भाग होऊ शकत नाही असं सुनीलने त्यावेळी सांगितलं होतं. मात्र तब्बल दीड वर्षानंतर कपिल आणि सुनील एकत्र येणार आहेत. तेदेखील कपिल शर्मा शोच्या मंचावर. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खानमुळेच हे शक्य झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कपिल आणि सुनील यांच्यात दीड वर्षापूर्वी काही कारणावरुन वाद झाले होते. या वादानंतर सुनीलने कपिलसोबत काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे हे दोघं पुन्हा कधीही एकत्र येणार नाही असा समज चाहत्यांमध्ये झाला होता. मात्र सलमानने या अशक्य गोष्टीवर मात करत या दोघांनी भेट घडवून दिली आहे. यापूर्वीदेखील सलमानने कपिल आणि सुनील यांच्यामधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं.
सलमान खानचा आगामी ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सुनील ग्रोवरने महत्वपूर्ण भूमिका साकारली असून लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होईल. या प्रमोशनसाठी सलमान कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. यावेळी त्याच्यासोबत सुनील ग्रोवरदेखील येणार आहे.
दरम्यान, सलमान खान ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता आहे. तर त्याच्या ‘भारत’मध्ये सुनील महत्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यामुळे कपिल आणि सुनील दोघेही सलमानच्या जवळ आहेत. या कारणास्तव हे दोघंही सलमानचा शब्द मोडू शकत नाही. परिणामी प्रमोशनच्या निमित्ताने या दोघांची भेट होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 12:45 pm