आपल्या नजरेनं सगळ्यांनाच घाळाय करणारी सोशल मीडियावरची हिट स्टार प्रिया वारियरचं बॉलिवूड पदार्पण आणखी लांबलं आहे. प्रिया ‘सिम्बा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती पण आता मात्र ही शक्यता पूर्णपणे मावळली आहे कारण या चित्रपटात प्रियाऐवजी साराची वर्णी लागली असून या चित्रपटात ती रणवीरसोबत मुख्या भूमिकेत दिसणार आहे.

‘नवा चेहरा, उत्साह, उर्जेनं भरलेला सुपरस्टार आणि दोन आघाडीचे निर्माते यांची बेरीज म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा सिम्बा’ अशा प्रकारे हटके प्रसिद्धी या सिनेमाची करण्यात आली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट ठरेल अशी ही जाहिरबाजी करत धर्मा प्रोडक्शननं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. करण जोहर आणि रोहित शेट्टी हे दोघंही सिम्बाचे निर्माते आहे. रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. करण गेल्या काहीदिवसांपासून मुख्य अभिनेत्रींच्या शोधात होता. यात प्रिया वारियरची वर्णी लागू शकते अशा जोरदार चर्चा होत्या पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून या शर्यतीत सारानं बाजी मारली आहे. सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुशांत सिंग राजपूत यात मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण काही कारणानं लांबलं आहे.

केदारनाथ पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच साराच्या वाट्याला आणखी एक चित्रपट आला आहे, त्यामुळे साराचाही आनंद गगनात मावेनासा झालाय. साराची सिम्बामध्ये वर्णी लागल्यानं साहजिकच प्रियाचं बॉलिवूडमधलं पदार्पण लांबलं आहे. सिम्बा चित्रपटाच्या निमित्तानं नवी जोडी बॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.