‘कॉफी विथ करण’मध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून रोष ओढावून घेणाऱ्या हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या वादावर इतक्या दिवसांनंतर पहिल्यांदाच करण जोहरनं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या शोचा सुत्रसंचालक असलेल्या करणनं या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. हार्दिक, के.एलला त्यांच्या विधानाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. या वादानंतर मी स्वत:लाही तितकाच दोष देत राहिलो कारण हे सर्व माझ्या कार्यक्रमात घडलं असं म्हणत करणनं माफी मागितली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल आले होते. या चॅट शोदरम्यान हार्दिकनं महिलांवर आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर अल्पावधितच हार्दिक आणि के. एल. राहुलला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. बीसीसीआयनं या दोघांवरही निलंबनाची कारवाई केली होती. आता या वादावर गप्प असलेल्या करणनं प्रथमच मौन सोडलं आहे.

‘हा माझा कार्यक्रम होता. मी त्या दोघांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं म्हणून मी स्वत:लाही तितकंच जबाबदार मानतो. चित्रीकरणादरम्यान तिथं टीममधल्या काही महिला देखील उपस्थित होत्या पण कोणाला त्यावेळी संकोचल्यासारखं वाटलं नाही. या वादानंतर माझी अक्षरश: झोप उडाली. आताची परिस्थिती पूर्णपणे माझ्या हाताबाहेर गेली आहे. प्रश्न विचारणं माझ्या हातात असतं पण त्याचं काय उत्तर द्यायचं हे पूर्णपणे समोरच्या व्यक्तीच्या हाती आहे. यामुळे झालेलं नुकसान कधी भरून निघेल या विचारात मी आहे अशी प्रतिक्रिया करणनं इटीनाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

त्यादिवशी कार्यक्रमात जे काही घडलं त्याचा मला पश्चाताप होत आहे, ते दोघंही जे काही बोललं त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे पण हा प्रकार माझ्या कार्यक्रमात घडला म्हणून मी देखील माफी मागतो असं म्हणत करणनं नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे.