अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर वाद सुरू झाला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका होऊ लागली. या ट्रोलिंगमुळे करण पूर्णपणे खचला असून तो रडत असल्याचा खुलासा त्याच्या एका जवळच्या मित्राने केला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करणच्या मित्राने त्याच्यावर ट्रोलिंगचा कसा परिणाम झाला आहे, याबद्दल सांगितलं.
“सुशांतच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे करण पूर्णपणे हादरला आहे. त्याच्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या सर्वांच्या त्याच्यावर खूप परिणाम होत आहे. अनन्या पांडेला लोकं आत्महत्या कर असं म्हणत आहेत. असे मेसेज वाचून तीसुद्धा खचली आहे. करणला जेव्हा कधी मी फोन करतो, तेव्हा तो रडतो. यात माझी काय चूक आहे, असा प्रश्न तो विचारतो”, असं करणच्या मित्राने सांगितलं.
या ट्रोलिंगमुळे सोशल मीडियावर करण जोहरच्या फॉलोअर्सची संख्या कमी झाली आहे. करणनेही अनेकांना अनफॉलो केलं असून कमेंट्स mute (पोस्टवर कोणीही कमेंट करु शकणार नाही) केले आहेत. करणसोबतच आलिया भट्ट, सलमान खान यांनाही ट्रोल केलं जातंय. आलिया भट्ट, महेश भट्ट, सोनी राजदान यांनीसुद्धा सोशल मीडियावर कमेंट्स mute केले आहेत.