चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीनं चित्रीत करण्यात येतं. अनेकदा या गाण्यांमध्ये अश्लील हावभाव आणि शब्दांचा भरणा असतो. चित्रपटातील कथानकाची गरज नसताही केवळ प्रसिद्धीसाठी चित्रपटात आयटम साँग दाखवली जातात. मात्र यापुढे आपल्या कोणत्याही चित्रपटात आयटम साँग नसेल अशी शपथ निर्माता, दिग्दर्शक करण जोहरनं घेतली आहे.

यापूर्वी ‘चिकनी चमेली’, ‘मेरा नाम मेरी है’ अशा आयटम साँगची निर्मिती करणच्या ‘धर्मा प्रोडक्शन’ अंतर्गत करण्यात आली होती. मात्र यापुढे आयटम साँग काढण्याची चूक करणार नाही अशी शपथ करणनं घेतली आहे. आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात येतं, या गाण्यातून वासना दिसते त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा अपमान होईल अशी गाणी यापुढे माझ्या चित्रपटात दाखवणार नाही अशी शपथ करणनं घेतली आहे.  अभिनेत्रीच्या डान्स नंबरवर माझा आक्षेप नाही मात्र ‘चिकनी चमेली’सारखे आयटम साँग यापुढे चित्रपटात दाखवण्यात येणार नाही असं करण जोहर म्हणाला. मात्र आयटम साँगवर कतरिनानं आपलं वेगळं मत मांडलं आहे.

‘आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जातं असं मला तरी वाटत नाही. मी अनेक आयटम नंबर केलेत पण मला कधीही ते जाणवलं नाही. मी या गाण्याचा मनमुराद आनंद लुटला, मला चित्रीकरण करताना खूपच मज्जा आली. मला त्यात काहीही गैर वाटलं नाही’ असं म्हणत करणच्या टीप्पणीवर तिनं नाराजी व्यक्त केली. कतरिनानं आतापर्यंत चिकनी चमेली, शिला की जवानी, सुरैया असे अनेक आयटम साँग केले आहेत.