Kargil Vijay Diwas 2018. भारतीय सैन्यदलाने आजवर बरीच युद्ध लढली. सीमारेषेवर शेजारी राष्ट्रासोबत सैन्यदलाच्या चकमकीही दररोजच सुरु असतात. या युद्धांपैकी काही युद्धांची आणि भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीची दखल कलाविश्वातही घेतली गेली. त्या धर्तीवर चित्रपटही साकारण्यात आले. यामध्ये अग्रस्थानी राहिलं ते म्हणजे कारगिल युद्ध. जवळपास १९ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यादरम्यान कारगिल युद्ध झालं. ज्यानंतर या दोन्ही देशांमध्ये असणारी सर्वच समीकरणं बदलून गेली होती. सैन्यदलात सेवेत असणाऱ्या बऱ्याच जवानांनी या युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता देशवासियांनीसुद्धा जवानांचे हे ऋण लक्षात ठेवले आणि पावलोपावली ते फेडण्याचा प्रयत्नही केला. कलाविश्वातही या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट साकारण्यात आले आहेत. ज्यामध्ये कारगिल युद्धाची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कारगिलशी हे बॉलिवूडचं एक वेगळं नातं आहे, असं म्हणायला हरकत नाही. अशा या युद्धाच्याच पार्श्वभूमीवर आधारित कथानक साकारले गेलेले चित्रपट खालीलप्रमाणे.

एलओसी कारगिल (२००३)- जे.पी. दत्ता दिग्दर्शित या चित्रपटातून कारगिलच्या युद्धावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. संजय दत्त, आयुब खान, सुनील शेट्टी, सैफ अली खान, अभिषेक बच्चन आणि इतरही बरेच कलाकार झळकले होते. पाकिस्तानच्या सैन्यविरोधी कारवाईला सामोरं जातेवेळी भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या पराक्रमांची गाथा या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. खऱ्या बोफोर्सचा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वापर करण्यात आला होता. तर त्यात युद्धाची दृश्य ही युद्धाच्याच वेळची संग्रहित दृश्य होती.

loc kargil

लक्ष्य (२००४)- फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सैन्यदलात लागणारी शिस्त, जवानांचं आयुष्य याच्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या चित्रपटाच्या वेळी सर्वात उंचावरुन क्रेनच्या सहाय्याने एका दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. लडाखमधील तंग्लांग्ला पास (समुद्रसपाटीपासून १७ हजार ५८२ फुट उंची) येथे २४ फुटी क्रेनच्या सहाय्याने या दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं.

Lakshya

टँगो चार्ली (२००५)– या चित्रपटाच्या शेवटच्या भागातील दृश्य ही कारगिलच्या युद्धावरच आधारित होती. भारताच्या सीमांत भागांध्ये सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारला होता.

Tango Charlie

धूप (२००३)- कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या कॅप्टन अनुज नय्यरच्या कुटुंबाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरलं होतं. शहिदाच्या कुटुंबियांना शासनाकडून घोषित केलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी कशा प्रकारे पायपीट करावी लागते याचं चित्रण अतियश प्रभावीपणे या चित्रपटातून करण्यात आलं होतं.

dhoop

स्टंप्ड (२००३)- क्रिकेट विश्वचषक आणि कारगिल युद्धाच्याच दिवसाचा आधार घेत या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन हिने सैन्यदल अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती, जिचा पती युद्धादरम्यानच बेपत्ता होतो. या चित्रपटाच्या एकंदर कथानकामुळे त्याची बरीच चर्चा झाली होती.

stumped

मौसम (२०११)- कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर शाहिद कपूर आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘मौसम’ हा चित्रपट साकारण्यात आला होता.

mausam