लॉकडाउनमुळे सेलिब्रिटी घरीच आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. करोना व्हायरसविषयी जनजागृती करण्यासाठी व लोकांमध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने उत्तम पर्याय शोधून काढला आहे. त्याने ‘कोकी पुछेगा’ या नावाने एक सीरिज सुरू केली आहे. या सीरिजमध्ये तो दररोज करोनामुक्त झालेल्यांशी संवाद साधणार आणि त्यांची मुलाखत सोशल मीडियावर पोस्ट करणार. पहिल्याच एपिसोडमध्ये त्याने गुजरातमधील पहिली करोनाग्रस्त सुमिती सिंह हिच्याशी संवाद साधला.

हँडवॉश, मास्क व इतर काळजी घेऊनसुद्धा सुमितीला करोनाची लागण

गुजरातमधील सुमिती ही तिच्या बहिणीसोबत बेकरी शॉप चालवते. कार्तिकने या मुलाखतीत सांगितलं, की सुमितीने सर्व प्रकारची काळजी घेतली होती. हँडवॉश वापरणं, मास्क वापरणं, इतकंच नव्हे तर व्हिटामिन सीच्या गोळ्यासुद्धा ती खात होती. मात्र तरीसुद्धा तिला करोनाची लागण झाली. सुमितीला फिरायला फार आवडतं आणि त्याचाच फटका तिला बसला. सुमिती फिरण्यासाठी फिनलँडला गेली होती आणि तिथून परतल्यावर तिला करोनाची लागण झाली.

असा दिला लढा

सुमितीला जेव्हा पहिल्यांदा लक्षणं दिसू लागली तेव्हाच तिने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं होतं. कुटुंबीयांशी ती व्हिडीओ कॉलद्वारे बोलत होती. ती स्वत: ड्राइव्ह करून रुग्णालयात गेली आणि त्यापुढे सर्व प्रकारची काळजी घेतली. सुमिती आता करोनामुक्त झाली असून ती लोकांमध्ये याबद्दल जनजागृती करण्याचं काम करतेय. सुमितीने वेळीच घेतलेल्या काळजीमुळे सुदैवाने तिच्या घरातील कोणालाच करोनाची लागण झाली नाही.