एकता कपूरची बहुप्रतिक्षित ठरलेली ‘कसौटी जिंदगी की- २’ ही मालिका काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिका प्रसारित झाल्यानंतर आता जवळपास साऱ्यांच पात्रांचा खुलासा झाला असून काही दिवसापूर्वीच कोमोलिकाच्या भूमिकेवरील पडदाही उचलण्यात आला आहे. अभिनेत्रीने हिना खान कोमोलिकाच्या भूमिकेत झळकली आहे. विशेष म्हणजे सध्या कोमोलिकाच्या रुपातली हिना चाहत्यांच्या पसंतीत उतरल्याचं दिसून येत आहे.

कधीकाळी सुपरहिट ठरलेल्या ‘कसौटी…’चा हा सीक्वल खास असल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे हा सीक्वल नव्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर व्हावा यासाठी मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेता शाहरुख खान झळकला होता. या प्रोमोमध्ये शाहरुख प्रेरणा आणि अनुरागची ओळख करुन देताना दिसला होता. हा प्रोमो त्यावेळी प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र काही दिवसापूर्वीच मालिकेत झालेल्या हिनाच्या एण्ट्रीने शाहरुखच्या प्रोमोचाही रेकॉर्ड मोडला आहे.

‘कसौटी…’च्या नुकताच दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये हिना खान कोमोलिकाच्या रुपात दिसत असून तिने तिच्या अदाकारीमुळे चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. विशेष म्हणजे शाहरुखचा समावेश असलेल्या प्रोमोपेक्षा सध्या हिनाच्या प्रोमोची चर्चा रंगली आहे. हिनाच्या या नव्या प्रोमोने लोकप्रियतेमध्ये शाहरुखला मागे टाकल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, ‘कसौटी…’मध्ये नुकतंच पदार्पण केलेल्या कोमोलिकाने अवघ्या काही काळातच प्रेक्षकांची मन जिंकल्यामुळे सध्या सर्वत्र तिचीच चर्चा रंगत आहे. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे.