बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान काही दिवसांपूर्वी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. तिने सोशल मीडियावर तेथील दर्शन घेतानाचे फोटो शेअर करत याची माहिती दिली होती. पण साराच्या या दर्शनाने वाद निर्माण झाला आहे.

साराने मंदिर दर्शन घेतल्यानंतर काशी समितीचे महासचिव चंद्रशेखर कपूर यांनी वक्तव्य केले. ‘साराने मंदिरात दर्शन घेणे परंपरेच्या विरुद्ध आणि आखलेल्या नियमांच्या विरोधात आहे. मंदिरामध्ये हिंदू नसलेल्या लोकांच्या प्रवेशावर बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहे. तरीही साराने मंदिरात प्रवेश करणे म्हणजे मंदिराच्य सुरक्षिततेवर प्रश्न उभा केल्यासारखे आहे’ असे चंद्रशेखर कपूर यांनी म्हटले आहे. यावर योग्य ते पाऊल उचलावे अशी विनंती काशी विकास समितीने केली आहे.

‘आम्ही हिंदू धर्मातील तिची रुची पाहून तिचा आदर करतो. पण ती एक मुसलमान आहे आणि तिने धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये. तिच्यासाठी हे सर्व मजेदार आणि उत्साही असेल. पण आमच्यासाठी तो धर्मिक श्रद्धेचा भाग आहे’ असे तेथील पुजारी राकेश मिश्रा यांनी म्हटले आहे.

सारा तिचा आगमी चित्रपट ‘अतरंगी रे’चे चित्रीकरण सुरु असताना काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिची आई अमरुता सिंह देखील होत्या. सारा दर्शन घेतल्यानंतर गंगा आरतीमध्ये देखील सहभागी झाली होती.