‘क्वांटिको गर्ल’ सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र ऐनवेळी प्रियांकाने या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिल्यामुळे तिच्या जागी अभिनेत्री कतरिना कैफची वर्णी लागली. प्रियांकाने ऐनवेळी नकार दिल्यामुळे कमी कालावधीमध्ये नव्या अभिनेत्रीचा शोध घेणं चित्रपटाच्या टीमला आव्हानासारखं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने जॅकलीन फर्नांडिस आणि कतरिना कैफ या दोघींपैकी एकीची निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, चित्रपटासाठी कतरिनाची निवड करण्यात आली. परंतु सलमान खानमुळे कतरिनाची निवड झाल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे सलमाननेच कतरिनाला ही ऑफर दिल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र  माझी निवड सलमानने केली नसून एका खास कारणासाठी मी या चित्रपटाला होकार दिल्याचा खुलासा कतरिनाने केला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कतरिनाला प्रियांका चोप्राच्या जागी तिला कास्ट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी चित्रपटामध्ये मला कास्ट करण्यामागे सलमानचा किंवा अली अब्बास जफरचा कोणताही संबंध नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
“मी, सलमान आणि अली अब्बास जफर तिघंही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मात्र कामाच्या बाबतीत आम्ही प्रामाणिकपणे वागतो. तिथे आमची मैत्री आड येत नाही. ‘भारत’च्या बाबतीतही तेच झालं आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट मला आवडल्यामुळे मी चित्रपटासाठी होकार दिला”, असं कतरिना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “प्रियांकाने नकार दिल्यानंतर या चित्रपटाची स्क्रिप्ट माझ्याकडे आली होती. ही स्क्रिप्ट मी तब्बल ३ तास वाचली त्यानंतर या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाची स्क्रिप्ट मला प्रचंड आवडली असून त्यातून नक्कीच काही तरी नवीन शिकता येईल या एका कारणासाठी मी चित्रपट करण्यास तयार झाले. मात्र माझ्या होकारामुळे किंवा मला हा चित्रपट मिळण्यामागे सलमान किंवा अली अब्बास जफरचा कोणताही हात नाही. इतकंच नाही तर मी चित्रपट साइन केल्यापासून ते ‘भारत’चं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत सलमानने मला एकदाही फोन केलेला नाही”.

दरम्यान, सलमानला कतरिनाचा बॉलिवूडमधील गॉडफादर मानलं जातं. या दोघांनी अली अब्बास जफर सोबत ‘टायगर जिंदा है’मध्ये काम केलं होतं. त्यानंतर आता ‘भारत’मध्ये सलमान कतरिना एकत्र दिसणार आहेत.  चित्रपटाच्या चित्रीकरणाला केवळ १० दिवस बाकी राहीले असताना प्रियांकानं अचानकपणे हा चित्रपट सोडत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे सलमान तिच्यावर नाराज होता. या चित्रपटाला नकार दिल्यानंतर प्रियांकाने लगेचच ‘द स्काय इज पिंक’चं चित्रीकरण सुरू केलं आणि भारतसाठी ऐनवेळी कतरिना कास्ट करण्यात आलं.