माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देत पैसे जिंकताना दिसतात. मंगळवारी केबीसीमध्ये स्पर्धकाला २५ लाख रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता. पण प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे स्पर्धकाने गेम सोडण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी गुजरातमधील वलसाड येथे राहणाऱ्या श्रुती सिंह या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. दरम्यान त्यांच्या चारही लाइफलाइन संपल्या होत्या. त्यामुळे २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.

श्रुती यांनी विचारण्यात आलेला प्रश्न-

आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?
A. गीता फोगाट
B. विनेश फोगाट
C. बबीता फोगाट
D. साक्षी मलिक

श्रुती यांना २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण खेळ सोडताना त्यांनी D. साक्षी मलिक असे उत्तर दिले. पण त्यांनी दिलेले हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर B. विनेश फोगाट हे आहे. श्रुती यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या आनंदी दिसत होत्या.