मनोरंजनासोबत माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा सोनी वाहिनीवरील बहुचर्चित शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ केबीसीमध्ये हजेरी लावणारे स्पर्धक आणि शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्यामुळे शो आणखी रंजक होतो. नुकताच केबीसी ११मध्ये कर्मवीर एपीसोडमध्ये हजेरी लावलेले समाजसेवक डॉ. अच्युत सामंत यांच्यामुळे शो चर्चेत आहे. अच्युत यांच्या मदतीसाठी अभिनेत्री तापसी पन्नूने शोमध्ये हजर होती. मात्र तापसीने अच्युत यांना फारशी मदत न केल्याने चाहते नाराज झाले असल्याचे पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सोनाक्षीला सोप्या प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हते त्याच प्रमाणे तापसीने देखील एका सोप्या प्रश्नासाठी लाइफलाईनचा वापर केला आहे.

बॉलिवूडमधील बरेच कलाकार इतिहासावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देताना अडखळताना दिसतात. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना देखील करावा लागतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला रामायणावर आधारीत विचारलेल्या सोप्या प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हेत. त्यामुळे सोनाक्षीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता अभिनेत्री तापसी पन्नूला ‘कुंभमेळ्यातील कुंभ या शब्दाचा अर्थ काय?’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते ‘मडकं’ (घडा) होते. मात्र तापसी या प्रश्नाते उत्तर देण्यात अयशस्वी झाली. त्यानंतर तापसीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

केबीसीमधील कर्मवीर एपीसोडमध्ये सहभागी झालेले डॉ. अच्युत सामंत हे ओडिसामधील प्रसिद्ध संस्थान केआयएसएस(KISS)चे संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ते आदिवासी भागातील अनेक मुलांना मोफत शिक्षण, निवारा आणि जेवण देण्याचे काम मागची अनेक वर्ष करत आहेत. ज्या भागात मुलांच्या शिक्षणाची कोणतीही सोय नाही अशा ठिकाणीच्या मुलांसाठी ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका साकारते.