News Flash

चित्ररंजन : अस्सल मातीतला चित्रपट

पश्चिम महाराष्ट्रात गावागावातून कुस्ती खेळली जाते. घरटी एक तरी गडी हा पैलवान असतो.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

२०१६ साली दिग्दर्शक सुजय डहाकेचा ‘फुंतरू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी त्याने दिग्दर्शित  केलेला ‘केसरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पदार्पणातच ‘शाळा’सारखा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट देणारा हा दिग्दर्शक मधल्या चार वर्षांत नेमके काय करत होता? याचे उत्तर म्हणजे एकाअर्थी हा चित्रपट म्हणता येईल. दिग्दर्शक म्हणून दरवेळी काहीतरी वेगळा विषय, वेगळे कलाकार घेऊन नवं काही साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुजयने यावेळी अस्सल मातीतल्या खेळाची आणि त्या खेळणाऱ्या कुस्तीवीरांची कथा या चित्रपटात रंगवली आहे. या चित्रपटातला ताजेपणा हेच त्याचे वैशिष्ठय़ म्हणता येईल.

पश्चिम महाराष्ट्रात गावागावातून कुस्ती खेळली जाते. घरटी एक तरी गडी हा पैलवान असतो. आणि एकदा तरी ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकण्याचे स्वप्न पैलवान उराशी बाळगून असतो. कु स्तीच्या या खेळाची आणि ते खेळणाऱ्या कुस्तीवीरांची कथाव्यथा मांडणारा हा चित्रपट आहे. या खेळाभोवतीही अनेक समज-गैरसमज आहेत, जे खरे म्हणजे आपल्या देशातील प्रत्येक खेळाला वेढून राहिलेले असतात. पैलवानगिरी हे गरिबांचे काम नाही. पैलवानाला शरीर कमवण्यासाठी खूप खुराक लागतो. चांगला खुराक आणि चांगली तालिम यातूनच पैलवान घडतो. त्याहीपेक्षा कुस्ती हा बुध्दीचा नाही तर शक्तीचाच खेळ म्हणून पाहिला जातो. मात्र या सगळ्या समजांना छेद देत कुस्तीचे वास्तव सुजयने या चित्रपटात रंगवले आहे. आखाडय़ात उतरून भल्याभल्यांना कुस्तीत चीतपट करण्याचे स्वप्न बलराम जाधव (विराट मडके)पाहतो आहे.  बलरामचे वडील गवळी, त्याची परिस्थिती बेताचीच आहे. शिवाय, आजोबांनी कुस्तीत फिक्सिंग केली होती म्हणून गावासाठी कायमच त्याचे घर हा टिंगलटवाळीचा विषय झाला आहे. या सगळ्या परिस्थितीतही बलराम आजोबांच्या मदतीने पैलवान होण्यासाठी धडपड करतो आहे. मात्र बलरामच्या वडिलांना हे मान्य नाही. अखेर एका क्षणी पैलवान होण्याचे स्वप्न मनाशी घेऊन बलरामला घर सोडावे लागते आणि इथून पुढे त्याचा शोध सुरु होतो. आखाडय़ात उतरण्यासाठी लागणारा खुराक कुठून आणायचा इथपासून तालिम देणारा गुरू कोण?, असे अनेक प्रश्न समोर असलेला बलराम महाराष्ट्र ‘के सरी’ बनतो का? आणि कसा?, या सगळ्याची उत्तरे देत सुजयने या अस्सल मातीतल्या खेळाचा थरार चित्रपटात जिवंत केला आहे.

‘केसरी’ या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे, असे म्हणता येणार नाही. पण त्यात कमालीचा ताजेपणा आहे. एकतर इथे कोणताही परिचित हिरोचा चेहरा चित्रपटासाठी म्हणून शरीर कमावून पैलवान झालेला दिसत नाही. विराट मडके या खरोखरच्या खेळाडूने अत्यंत मेहनतीने, कुठल्याही उत्तेजकांशिवाय किंवा प्रोटीन सप्लिमेंटशिवाय व्यायाम आणि आहाराच्या बळावर शरीर कमावले आहे. चित्रपटातही विराटसारखेच अस्सल पैलवान पहायला मिळतात. प्रतिकूल परिस्थितीतही बलरामची पैलवान म्हणून होणारी जडणघडण इथे पहायला मिळते. मनात जिद्द असेल तर कुठलेही यश मिळवणे कठीण नाही, हा विचार अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटातील कलाकार, त्यांचा सहजअभिनय, अस्सल ग्रामीण बाजाचे संवाद, अप्रतिम छायाचित्रण, त्याला उत्तम गाण्यांची जोड या सगळ्याची भट्टी जमून आलेला असा हा चित्रपट आहे. विराट आणि रुपा बोरगावकर या दोन्ही नवोदित कलाकारांची जोडी आत्मविश्वासाने पडद्यावर वावरली आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. या दोघांना महेश मांजरेकर, विक्रम गोखले, उमेश जगताप, छाया कदम अशा मातब्बर कलाकारांची साथ लाभली आहे. नव्या-जुन्या कलाकारांची ही वीण उत्तम जमली आहेच, पण त्याचबरोबरीने विक्रम गोखले आणि महेश मांजरेकर या दोघांनाही आधी न पाहिलेल्या भूमिकांमधून वेगळ्याच शैलीत दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर आणले आहे. त्यामुळे आपोआपच कथा नेहमीच्या पठडीतली असली तरी त्यात एक वेगळेपणा साधला गेला आहे. संगीताच्या बाबतीत केलेले प्रयोगही चित्रपटाच्या पथ्यावर पडले आहेत. बलरामला कुस्तीचे धडे देणाऱ्या वस्ताद मेहमानच्या भूमिकेत मांजरेकरांना पाहणे ही पर्वणी आहे. मनगटातले बळ आणि बुध्दीचा प्रयोग यांचा मिलाफ साधण्याचे तंत्र अगदी छोट्या -छोटय़ा गोष्टीतून वस्ताद बलरामला शिकवत राहतो. पैलवानाच्या आयुष्यातला विरोधाभास, खेळ की पैसा हे द्वंद्व अशा अनेक गोष्टींना दिग्दर्शकाने कथेच्या ओघात स्पर्श केला आहे. कुस्ती म्हणजे नुसतीच मस्तवाल शरीराची मस्ती नाही, तो बुध्दीचातुर्याने आणि मनापासून खेळला जाणारा खेळ आहे, हे दाखवणारा हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून सुजय डहाकेची करामत, त्याची तंत्रावरची हुकूमत पुन्हा एकदा दाखवून देतो. साधीशीच गोष्ट अत्यंत सुंदर, कलात्मक पध्दतीने सांगणारा ‘केसरी’ म्हणूनच मनाला ताजातवाना करून जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:20 am

Web Title: kesari marathi movie review abn 97
Next Stories
1 टेलिचॅट : मालिकांच्या ऋणात..
2 विदेशी वारे : हार्वे वेन्स्टिनवरचे आरोप सिद्ध
3 पाहा नेटके : तीन पिढय़ांच्या प्रेमाची गोष्ट..
Just Now!
X