भयपट आणि विनोदी चित्रपट ही तशी दोन टोके आहेत. या दोन्ही टोकांना एकत्र आणण्याचा फारसा प्रयत्न हिंदी चित्रपटांमधून झालेला नाही. परंतु दिग्दर्शक अमर कौशिकने ‘स्त्री’ या चित्रपटातून विनोदी भयपट बॉक्स ऑफिसवर राज्य करु शकतात हे सिद्ध करुन दाखवले आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये कोणताही विनोदी भयपट प्रदर्शित झाला नाही. आता दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांचा दक्षिणात्य चित्रपट ‘कंचना’ या चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक चित्रीत होणार आहे.
या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. सूत्रांनुसार या रिमेकमध्ये अक्षय कुमारसह अभिनेता आर माधवन आणि कियारा अडवाणी देखील दिसणार असल्याचे समोर आले आहे. कियाराला चित्रपटाची कथा फार आवडली आहे. तसेच आर माधवनने चित्रपटात काम करण्यास होकार दिला असल्याचे समोर आले आहे.
‘कंचना’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला या महिन्यात सुरुवात होणार असून २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच या रिमेकचे दिग्दर्शन खुद्द राघव करणार की बॉलिवूड दिग्दर्शक करणार हे अद्याप समोर आले नाही.
‘कंचना’ हा दाक्षिणात्य विनोदी भयपट आहे. या चित्रपटाचे दोन भाग या आधी प्रदर्शित झाले असून १९ एप्रिल रोजी ‘कंचना ३’ हा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स केले असून चित्रपटात राघव लॉरेन्स, अभिनेत्री ओव्हिया आणि वेधिका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
नुकताच अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. आता अक्षय कुमार ‘हाऊसफुल ४’ चित्रपटामध्ये झळकणार आहे.