बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी गेल्या वर्षी दिग्दर्शक करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सच्या चित्रपटामध्ये मध्ये झळकली होती. या चित्रपटानंतर कियारा प्रसिद्धीच्या झोतात आली. कियारासह अभिनेता विकी कौशल देखील या चित्रपटामध्ये झळकला होता. आता पुन्हा एकदा कियारा एका नव्या नेटफ्लिक्स चित्रपटामध्ये दिसणार आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या ट्विटरवरून या चित्रपटाची माहिती दिली आहे. या नेटफ्लिक्स चित्रपटाचे नाव ‘गिल्टी’ असे असून या चित्रपटाची निर्माती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारे करण्यात येणार आहे. तसेच या चित्रपटातून कियारा पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर परतणार आहे. दरम्यान या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. कियारासह आणखी कोण या चित्रपटात झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

कियाराचा नुकाताच ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरल्याचे दिसत आहे. या चित्रपटात कियारासह शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असल्याचे देखील दिसत आहे. ‘कबीर सिंग’ हा चित्रपट दाक्षिणात्य ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे.