निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच अनेक कलाकारांसाठी एका चांगल्या मित्राची आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. अशा या बहुगुणी करण जोहरच्या चॅट शो ला म्हणजेच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाला त्याच्या वेगळ्या स्वरुपामुळे प्रेक्षकांची पसंती मिळते. करणच्या कार्यक्रमाचे स्वरुप, अतरंगी प्रश्न, त्यावर सेलिब्रिटींची उत्तरं आणि एकंदर रंगणारी गप्पांची मैफल याबद्दल देखील बी टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगत असते. करण जोहरच्या या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये यावेळी विनोदवीर कपिल शर्मा याने हजेरी लावली. कपिलच्या येण्याने करणच्या कार्यक्रमामध्ये त्याचा देसी टच पाहायला मिळाला.

करणच्या विविध प्रश्नांची उत्तरं देत असतानाच जेव्हा काही इंग्रजी शब्दांना करणने कपिलला हिंदीमध्ये भाषांतरित करण्यास सांगितले तेव्हा कपिलची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ याचा हिंदीत काय अर्थ होणार असे विचारले असता, ‘फॉल्ट’ म्हणजे ‘चूक’ असा अर्थ घेत कपिलने त्याचे भाषांतर ‘यात शाहरुख खानची चूक आहे’ असे केले. त्यामुळे शाहरुख खानच्या नावाचा उल्लेख होणं ही केवळ योगायोगाची गोष्ट आहे असेच म्हणावे लागेल. कपिलची विनोदी फटकेबाजी आणि त्याला करणच्या धमाल प्रश्नांची जोड या सर्वांमुळे कॉफी विथ करणचा येणारा भाग हा सर्वांगाने निखळ मनोरंजन करणाराच असणार आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

https://twitter.com/StarWorldIndia/status/836085967450578945

https://twitter.com/StarWorldIndia/status/835892192560361472

दरम्यान, नेहमीच कार्यक्रमात कलाकारांना बोलावून त्यांच्यासोबत हास्यमैफल रंगवणारा कपिल शर्मा ज्यावेळी करण जोहरच्या प्रश्नांच्या जाळ्यात अडकतो त्यावेळी तो या प्रश्नावलीचा सामना नेमका करतो तरी कसा…? त्याला यात यश मिळतं का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लवकरच ‘कॉफी विथ….’चा हा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सध्या करण जोहर त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामांमध्ये व्यग्र असून ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटाचा सिक्वल बनविण्यासाठी तो पुढे सरसावला आहे.