#MeToo या मोहिमेअंतर्गंत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांची नावं पुढे आली आहेत. यामध्ये सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनी ‘क्वॉन’चे (Kwan Entertainment) सह-संस्थापक अनिर्बन दास ब्ला (Anirban Blah) यांचं नाव समोर आलं असून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

क्वॉन कंपनीचे सह संस्थापक असलेले अनिर्बन ब्ला यांच्यावर कंपनीतील काही महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. या आरोपानंतर ब्ला यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली. इतकंच नाही तर कंपनीतून हकालपट्टी केल्यानंतरही ब्ला कंपनीसोबत काम करत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. या साऱ्यामुळे नैराश्यात गेलेल्या ब्ला यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

‘नवी मुंबईतील वाशी पुलाजवळ एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आम्ही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ब्ला पुलाच्या कठड्याजवळ उभे होते. ब्ला यांना पाहताच आम्ही त्यांना पूलापासून बाजूला खेचत याप्रकाराविषयी चौकशी केली. चौकशीदरम्यान मी टू मोहिमेअंतर्गंत त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला’, अशी माहिती वरिष्ठ वाहतूक पोलिसांनी दिली.

ब्ला यांनी त्यांच्या अन्य नऊ सहकार्यासोबत मिळून क्वॉन या सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली होती. या नऊ जणांमध्ये चार महिला सहकार्यांचाही समावेश होता. परंतु या चार महिलांनीच ब्ला यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले. या आरोपामुळे ब्ला आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे ब्ला यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.

दरम्यान, ब्ला हे केवळ पुलाजवळ उभे होते. त्यांच्या कृतीतून ते आत्महत्या करत असल्याचे न जाणविल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल देशमुख यांनी सांगितलं. विशेष म्हणजे तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सुरु झालेल्या या #MeToo मोहिमेमुळे फिल्म इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींची नावं समोर आली आहेत.