गानसम्राज्ञी लता मंगेशकर सोमवारी वयाची ८६ वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यानिमित्त ‘रंगस्वर’तर्फे ‘लतादीदी आणि रागदारी’ या वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नरिमन पॉईण्ट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या चौथ्या मजल्यावरील रंगस्वर सभागृहात करण्यात आले आहे. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळात लतादीदींनी गायलेल्या गाण्यांमधील रागसौंदर्य संगीतविषयक विपुल लिखाण करणारे पत्रकार आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायक अमरेंद्र धनेश्वर सप्रात्यक्षिक उलगडून दाखविणार आहेत. सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे साधारण १९५० ते १९६० या दशकातील काळ मानला जातो. या काळात चित्रपटाचा रूपेरी पडदा  कृष्णधवल असला तरी चित्रपटांतील गाणी आणि एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, मदन मोहन आदी दिग्गज संगीतकारांचे वैविध्यपूर्ण संगीत यामुळे तो सुवर्णकाळ रंगीबेरंगी ठरला असे म्हणायला हरकत नाही. सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
संपर्क – २२०४७२५२.