जगभरात सध्या करोना व्हायरसने आपली दहशत पसरवली आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काही विशेष सल्ले लोकांना दिले आहेत.

काय म्हणाल्या लता मंगेशकर?

“नमस्कार, सध्या जगभरात फैलावलेला करोना हा एक प्राणघातक विषाणू आहे. मात्र गोंधळू नका, घाबरु नका. सावध राहा आणि अफवा पसरवू नका.”

“आपण जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे स्वच्छता राखा. सर्दी, ताप, खोकला असलेल्या लोकांपासून थोडं दूर राहा. त्यांना लगेचच उपचार घेण्यास सांगा. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करा. सुरक्षित आणि निरोगी रहा!” अशा आशयाचे दोन ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहेत. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

लता मंगेशकर सध्या सिनेसृष्टीत कार्यरत नाहीत. मात्र सोशल मीडियाव्दारे त्या कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.