भक्ती परब

पालक आणि मुलांच्या नात्यातील संवादाची सुरेल वीण पुन्हा घट्ट करण्यासाठी ‘एक सांगायचंय.. अनसेड हार्मनी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता लोकेश गुप्ते यांचे आहे. चित्रपटाचा विषय, कलाकारांची निवड, आजच्या काळाला त्याचे साजेसे असणे अशा बऱ्याच मुद्दय़ांवर मराठी चित्रपटात पहिल्यांदाच काम करणाऱ्या अभिनेता के. के. मेनन यांच्याशी केलेली बातचित. प्रादेशिक चित्रपट आशयघन असून वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या प्रादेशिक चित्रपटांमुळेच भारतीय चित्रपटसृष्टीत एक जिवंतपणा दिसून येतो, असे मेनन यांनी सांगितले.

हा माझा पहिलाच मराठी चित्रपट असला तरी तो अतिशय महत्त्वाचा आहे. पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चालल्याची समस्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण त्याकडे डोळेझाक करतो. एकमेकांना समजून घेणे होत नाही. आमच्या लहानपणी इंटरनेट वगैरे काही नव्हते. आता इंटरनेटने एक प्रकारे पालकांची जागा घेतली आहे. ही समस्या कुठल्या एका वर्गाची नाही तर सगळ्याच सामाजिक स्तरावर ही गोष्ट घडत असल्याने सर्वव्यापी असा हा विषय आणि त्यावरचा चित्रपट म्हणूनच मला महत्त्वाचा वाटला, असे के. के. मेनन सांगतो.

हा चित्रपट करताना मराठीचा सराव करावा लागला तरी या भाषेत बोलणे ही आपली समस्या नव्हती. नेहमी पटकथा वाचनूच माझ्या भूमिकेकडे किती जबाबदारीचे काम आहे ते आधी पाहतो. त्यानुसार आजवर चित्रपट करत आलो आहे. बाकी चित्रपटनिवडीचे तसे काही माझे ठोकताळे नाहीत. दिग्दर्शक लोकेश गुप्तेने पटकथा ऐकवली तेव्हा जवळजवळ २० मिनिटांतच मी होकार दिला. कारण लोकेश पूर्णपणे त्या विषयात बुडालेला होता. त्याची तयारी वाखाणण्याजोगी होती. मग आम्ही एकत्र बसून या पटकथेवर काम केले. मला माझे मराठी सुधारायचे होते. मी लहानपणापासून मराठी ऐकत आलो आहे. पुणे, चंद्रपूर आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी राहिलोय. रोज मराठी बोलत नसल्यामुळे अडथळा यायचा. मग चित्रीकरणस्थळी काम करताना भाषेवर मेहनत घेतली. संवादबाजी करणारा मी अभिनेता नाही. रोजच्या जगण्यात आपण जसे बोलतो त्याच पद्धतीने संवाद म्हणण्याची माझी पद्धत असल्याचे त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या चित्रपटात कित्येक वर्षांनी अभिनेत्री राजेश्वरी सचदेवबरोबर काम केले आहे. राजेश्वरी एक गुणी अभिनेत्री असून आपल्या  वरून तोडीस तोड असणाऱ्या कलाकारांबरोबर काम करताना आपल्याही अभिनयाचा कस लागतो. चित्रपटातील सगळे नवोदित कलाकारही मेहनती होते. त्यामुळे काम करताना मजा आली. माझे मराठी बोलणे किती छान आहे, हे बघण्यासाठीही प्रेक्षकांनी चित्रपुटगृहात यावे आणि हा चित्रपट पाहावा, असेही तो हसत हसत म्हणाला.

‘एमबीए’पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर जाहिरात क्षेत्रात काम करत होतो. पण आपली खरी आवड वेगळीच आहे हे मला कळले. अभिनयाची आवड होतीच. आपली खरी आवड काय आहे आणि आपल्याला कशातून आनंद मिळू शकतो, हे प्रत्येकाला ओळखता आले पाहिजे. माझी आवड मी ओळखली आणि नसिरुद्दीन शहा यांच्याबरोबर ‘महात्मा वर्सेस गांधी’ हे नाटक केले. पृथ्वी थिएटरशी जोडल्या गेलेल्या समकालीन नाटय़कर्मीबरोबर काम केल्यानंतर हळूहळू चित्रपटातून संधी मिळत गेली आणि त्यानंतर चित्रपटाकडे वळलो. चित्रपट महोत्सवांचाही आशयघन, दर्जेदार चित्रपट निर्मितीत महत्त्वाचा वाटा आहे. विविध प्रकारचे उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याचे चित्रपट महोत्सव हे उत्तम व्यासपीठ असते. महोत्सवामध्ये जे चित्रपट आपण पाहतो तेही लोकप्रिय व्हायला पाहिजेत, असेही त्याने सांगितले.

कोणत्याही प्रकारचा संकुचित दृष्टिकोन ठेवत नाही. माझे समकालीन कलाकार, तंत्रज्ञ, मी पाहिलेले आणि अभिनय केलेले चित्रपट आणि ज्येष्ठ कलाकारांचा लाभलेला सहवास हे सगळेच प्रेरणादायी आहे. माझ्या आजवरच्या प्रवासात खूप लोकांनी मला साथ दिली आहे. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी मी टिपत राहतो. त्यातून काही तरी मिळवून ते माझ्या कलेत सामावून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. कलाकाराने कधीही संकुचित दृष्टिकोन ठेवू नये. त्याचे मन मोठे असले पाहिजे, त्याने मनात कोणतीही अढी ठेवली नाही तर सगळे सोपे होऊन जाते, असेही मेनन म्हणाला.

‘मुलांवर दबाव आणि पालकांची जबाबदारी यांचे द्वद्वं’

‘एक सांगायचंय..’ या चित्रपटाचा विषय रोजच्या घडामोडींतून, आसपासच्या घटनांमधूनच मिळाला. मुलांवर सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आहेत. शिक्षण घेणं, करिअर निवडणं, नातेसंबंधांचा गुंता, नोकरी-व्यवसायातली स्पर्धा अशा खूप गोष्टींचा त्यांच्यावर ताण आहे. त्यातूनही वाट काढत स्वत:ला सिद्ध करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. पालकांना मुलांकडून खूप अपेक्षा आहेत, ज्या पूर्वीही होत्या. आणि आजही आहेत. या अपेक्षांचे त्यांच्यावर ओझे होतेय का, त्याचा विचार आपण करणे भाग आहे. इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चाललाय. अशा वेळी दोघांचीही बाजू विचारात घेणे गरजेचे आहे. आधी असे व्हायचे की एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला जायचा. आता जग त्याच्या पलीकडे गेलेय. मुलांना पालकांपेक्षा ‘गुगल’ जास्त जवळचे झाले आहे. त्यामुळे अशा वेळी मुलांचे काही निर्णय चुकू शकतात, काही बरोबर असू शकतात, पण यामुळे संवाद हरवतोय. त्यामुळे यातून बरेवाईट काही घडण्याची शक्यता असते. म्हणूनच हा विषय लिहायला घेतला आणि त्याचे दिग्दर्शन करायचे ठरवले. या चित्रपटाची गोष्ट ताकदीने मांडणे आवश्यक होते. कारण हा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे त्याच ताकदीचे कलाकार मला हवे होते. या चित्रपटात संवाद फार कमी आहेत. दृश्यातली शांतता खूप बोलते. लिहून झाल्यावर मला असे वाटले की के. के. मेनन आणि राजेश्वरी सचदेव हे पालकांच्या भूमिकांसाठी अगदी योग्य आहेत. दोघांनीही काही वेळातच होकार दिला. पालक आणि मुलांच्या संवाद हरवण्याला कु ठलीही एक पिढी जबाबदार नाही. काळाप्रमाणे आव्हाने बदलतात. अशा वेळी जाणूनबुजून नाही, पण नकळतपणे काही गोष्टी पालकांकडून आणि मुलांकडूनही घडत असतात. त्याचा विचार व्हायला हवा आणि मुलांशी सातत्याने संवाद साधत राहायला हवे, हे मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे.

लोकेश गुप्ते