|| स्वप्नील घंगाळे

टाळेबंदी उठली, करोनाचा ससेमिराही संपला आणि तुम्ही तुमच्या मित्रांना भेटलात तर जशी त्यांना कडकडीत मिठी माराल आणि धम्माल उडवून द्याल तसाच काहीसा प्रकार नुकताच साऱ्या जगाने अनुभवला. जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘फ्रेंड्स’ या मालिकेतील कलाकार तब्बल १७ वर्षांनंतर एकत्र आले. गेला आठवडा त्यांच्या चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘फ्रेन्ड्स’मय ठरला. या मालिके तील मोनिका, जोई, चँडलर, रॉस, फिबी, रेचल या आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांना एकाच स्टेजवर एकाच वेळी तसाच गोंधळ घालताना आणि किस्से सांगताना पाहणं हे चाहत्यांसाठी डोळ्यांचं पारणं फेडणारा अनुभव होता.

गेल्या आठवड्यात गुरुवारी दुपारी भारतात ‘झी फाइव्ह’वर ‘फ्रेंड्स रियुनियन’चा हा खास भाग प्रदर्शित झाला. दोन तासांचा हा शो पाहण्यासाठी चाहत्यांच्या या ओटीटीवर अक्षरश: उड्या पडल्या होत्या असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मालिके तील आता पन्नाशीत पोहोचलेल्या कलाकारांनी जुन्या आठवणींना दिलेला उजाळा, मूळ कार्यक्रमातील आठवणीतील प्रसंग पुन्हा साकारण्याचा प्रयत्न, दृश्य वाचन, मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से, सेट भेट असं बरंच काही या दोन तासांमध्ये घडलं. चाहत्यांसाठी हा भाग म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका ठरला यात शंका नाही. म्हणूनच हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या सात तासांमध्ये तब्बल १० लाख भारतीयांनी हा शो पाहिला. या कार्यक्रमाला एवढा प्रतिसाद होता की भारतामध्ये काही काळ झी फाइव्हच्या यंत्रणेला तांत्रिक बिघाडाचाही सामना करावा लागला.

रेचलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि रॉसची भूमिका साकारणाऱ्या डेव्हिड स्क्विमरने खऱ्या आयुष्यातही आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो अशी कबुली या भागात देत चाहत्यांना धक्का दिला. संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या या मालिकेतील प्रमुख पात्रांनीच आपण ही मालिका अद्याप पूर्ण पाहिली नसल्याचा खुलासाही यावेळी केला. फिबीची भूमिका साकारणाऱ्या लिसा कुड्रोनेही आपण स्वत: ही मालिका पूर्ण पाहिली नसल्याचं सांगितलं. तर डेव्हिडनेही आपण ही संपूर्ण मालिका १७ वर्षांनंतर नुकतीच आपल्या मुलीसोबत पाहून पूर्ण केल्याचं सांगितलं. डेव्हिडसंदर्भातील आणखीन एक खुलासा या भागात झाला तो म्हणजे खास त्याला डोळ्यासमोर ठेवून रॉसची भूमिका लिहिण्यात आली होती. ही व्यक्तिरेखा त्यापद्धतीने पूर्ण लिहून झाल्यानंतर निर्मात्यांनी त्याच्याकडे काम करण्यासंदर्भात आग्रह धरला. मात्र टीव्ही मालिकांमधील काम बंद करून नाटकाकडे परतण्याचा निर्णय घेणाऱ्या डेव्हिडने आधी थोडे आढेवेढे घेतले. नंतर त्याने या मालिकेला होकार दिला. डेव्हिड हा या मालिकेसाठी निवडण्यात आलेला पहिला अभिनेता होता. या सिरीजमधील चँडलर अर्थात मॅथ्यू पेरीच्या आजारपणाबद्दलसुद्धा समाज माध्यमांवर चर्चा रंगली होती. चित्रीकरणाच्या आधी त्याच्या दातांवर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्याचे हावभाव आणि संवादफे कीची शैली वेगळी होती, हे नंतर स्पष्ट झालं. जॅक आणि जुडी गॅलर यांची या मालिके तील छोटीशी झलक सर्व ‘फ्रेंड्स’च्या चाहत्यांसाठी खास होती.

कट्टर चाहत्यांनाही गोंधळवून टाकणाऱ्या या खुलाशांबरोबरच मालिकेतील गाजलेल्या भागांमधील कपडे घालून या क लाकारांनी केलेले रॅम्पवॉक, चाहत्यांसोबतच्या गप्पाही भन्नाट रंगल्याचं या भागात दिसून आलं. या भागासाठी अनेक तारांकित पाहुण्यांनीही आवर्जून हजेरी लावली होती. यात के – पॉप बॅण्ड बीटीएस, गायक जस्टीन बिबर, गायिका लेडी गागा, फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेता कीट हॅरिंग्टन, सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझाई, अमेरिकन अभिनेत्री मॅगी व्हिलर, अभिनेता टॉम सेललेक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांनी ‘फ्रेंड्स’शी संबंधित आठवणींना उजाळा दिला. अनेक तारांकितांचा ज्या पद्धतीने या रियुनियनमध्ये सहभाग होता, त्याप्रमाणे या मालिके त अविस्मरणीय भूमिका साकारणारे काही नामवंत चेहरेही या रियुनियनमध्ये असायला हवे होते असा सूर चाहत्यांमध्ये उमटतो आहे. यामध्ये मूळ व्यक्तिरेखांपैकी एक असलेल्या कॅरोल, माईक, बेन यांसारख्या व्यक्तिरेखांबद्दलही रियुनियनमध्ये काहीतरी हवं होतं, अशी भावना चाहत्यांनी समाजमाध्यमांवरून व्यक्त के ली आहे.

गेले कित्येक दिवस ‘फ्रेंड्स’च्या या पुनर्भेटीची उत्सुकता होती. जगभरात करोनाचा कहर झाल्याने ही पुनर्भेट एकदा लांबवण्यातही आली. त्यामुळे होणार होणारच्या तालावर असलेल्या या रियुनियनची तारीख जाहीर झाल्यानंतर भारतातही ट्विटरवर ‘फ्रेंड्स’ संदर्भातील हॅशटॅग ट्रेण्ड होत होते. या पुनर्भेटीचे निमित्त साधत अनेक कंपन्यांनी ‘फ्रेंड्स रियुनियन थीम’च्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची हटके जाहिरातबाजीही केली. अनेक भारतीय कलाकारांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या रियुनियनमध्ये सहभाग नोंदवला. भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने शतक साजरा केल्यानंतरचा चाहत्यांना अभिवादन करतानाचा जुना फोटो पोस्ट करत मी या ‘फ्रेंड्स’ सोबतच्या रियुनियनची वाट पाहतोय अशी पोस्ट केली होती. तर आलिया भट्ट, गौरी खान, मल्लायका अरोरा, सोफिया चौधरी या सेलिब्रिटींनीही समाजमाध्यमांवरून ‘फ्रेंड्स रियुनियन’ पहात असल्याचं सांगत स्टेटस पोस्ट केले. एकंदरीतच सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच सध्याच्या करोना परिस्थितीमुळे आलेली मरगळ या ‘फ्रेंड्स रियुनियन’ने थोडी का होईना दूर के ली, अशा भावनाही चाहत्यांनी व्यक्त के ल्या आहेत. एखादी मालिका इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या मनात घर करून राहू शकते, लोक पुन्हा त्या मालिके च्या आठवणीत रमतात, त्याचा आनंद नव्याने अनुभवतात हे या ‘फ्रेंड्स द रियुनियन’ने दाखवून दिले आहे.