रेश्मा राईकवार

टाळेबंदीने ६० ते ७० चित्रपटांचे प्रदर्शन लांबले; ‘ओटीटी’ माध्यमाकडून प्रतिसाद शून्य

राष्ट्रीय पुरस्कारांपासून जागतिक महोत्सव गाजविण्याचा शिरस्ता पाळणाऱ्या मराठी चित्रपटांना गेल्या काही वर्षांपासून आलेले बरे दिवस करोनाच्या संकटाने संपवून टाकले आहेत.  चित्रपटगृह सुरू नसल्यामुळे प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या चित्रपटांसमोर प्रतीक्षेखेरीज कोणताही पर्याय नसून ‘ओटीटी’ या रंजनाच्या नव्या फलाटाचा आधार मिळत नसल्याने तब्बल ६० ते ७० चित्रपट अडकले आहेत. चित्रनिर्मिती क्षेत्रातील कोटय़वधींची उलाढाल होत असलेल्या साऱ्याच यंत्रणा त्यामुळे हवालदील झाल्या आहेत.

सुट्टी आणि गर्दी हे एप्रिल – मे महिन्याचे समीकरण मराठी चित्रपटांच्याही पथ्यावर पडणारे असते. या दोन महिन्यात अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत होते. मात्र त्यांच्यासमोर आता थांबून राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. ओटीटी माध्यमही प्रतिसाद देत नसल्यामुळे तयार झालेल्या चित्रपटाचे करावे काय, असा सवाल  निर्माते सुनील फडतरे यांनी केला.  फडतरे यांची निर्मिती असलेला ‘बस्ता’ हा चित्रपट २७ एप्रिलला प्रदर्शित होणार होता.

ऑक्टोबपर्यंत प्रतीक्षा?

ओटीटीही नाही आणि चित्रपटगृह तसेच उपग्रह वाहिन्यांवरील प्रसारणाच्या हक्कातून मिळणारा नफा मिळवायचा असेल तर ऑक्टोबपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नाही, अशा कात्रीत निर्माते सापडले आहेत. चित्रपटगृहातून चित्रपट लावणे हेच योग्य आणि दीर्घकालीन फायद्याचे आहे. ज्या निर्मात्यांना अगदीच आर्थिक अडचण असेल त्यांच्यासाठी ओटीटी हा पर्याय ठरू शकतो, मात्र त्यांना ओटीटीवर चित्रपटासाठी किती रक्कम मिळते आहे हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे, असे निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितले.

गणित बिघडले..

मराठीत काही निर्मात्यांनी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शनासाठी बोलणी सुरू के ली होती. मात्र मराठी चित्रपटांना ओटीटीवर अजून हवा तसा प्रेक्षकवर्ग नसल्याने सर्वसाधारण बजेटच्या चित्रपटांना चांगली किं मत मिळत नाही. ‘दे धक्का २’ सारखा चित्रपट ज्यात मराठीतील लोकप्रिय कलाकार आहेत, त्यांचे बजेट जास्त असल्याने तेवढी रक्कम खर्च करण्याची ओटीटी कं पन्यांची तयारी नसल्याने सध्या ओटीटी आणि मराठी चित्रपटांचे गणित बिनसलेले आहे, असे चित्रपट वितरक सनी चंदरामाणी यांनी स्पष्ट केले.

अडचण काय?

चित्रपटगृहे सुरु होण्यास लागलेला विलंब आणि ओटीटी माध्यमांनी मराठी चित्रपट स्वीकारण्यास दिलेला नकार यामुळे मार्चपासून प्रदर्शनासाठी रखडलेले ३० ते ३५ चित्रपट आणि जून-जुलैमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज असलेले असे एकू ण ६० ते ७० मराठी चित्रपट अडचणीत आहेत.   ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सने प्रादेशिक चित्रपटांचे हक्क विकत घेणे थांबवले असल्याने मराठी चित्रपटांना या तिसऱ्या माध्यमावर सध्या प्रतिसाद मिळत नाही.

रखडलेले चित्रपट

पांघरूण, येरे येरे पावसा, दगडी चाळ २, दे धक्का २, बस्ता, मी वसंतराव, ईमेल फीमेल, नेबर्स, अनन्या, स्पर्श, आठवा रंग प्रेमाचा, वाजवू या बॅण्डबाजा या चित्रपटांसह आता पोस्ट प्रॉडक्शनमध्ये अडकलेले आणि जूननंतर प्रदर्शित होणारे सरसेनापती हंबीरराव, जंगजौहर अशा लहानमोठया चित्रपटांसह ६० ते ७० मराठी चित्रपटांचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे गेले आहे.

ओटीटी नाहीतर थेट उपग्रह वाहिन्यांनी चित्रपटाचा प्रीमिअर करावा. आम्ही प्रसिध्दीसाठी खर्च करू. मुद्रित माध्यमे आणि वाहिन्यांवर जाहिरातीही देऊ असा प्रस्तावही आम्ही वाहिन्यांकडे मांडला. त्यांना तो विचार आवडला असला तरी अजून त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

– सुनील फडतरे, चित्रपट निर्माता