कलाकारांना शोधणं त्या-त्या व्यक्तिरेखांनुसार हे एक आव्हान असतंच. मुळात जे कलाकार नाहीयेत त्यांना व्यक्तिरेखांनुसार कास्ट करणं हीच खरी कसोटी असते. त्यांची एक वेगळी अभिनय कार्यशाळा भरवून त्यांच्याकडून आपल्याला हवा तसा अभिनय करवून घेणं आणि ते प्रेक्षकांसमोर सादर करणं हे जितकं आव्हानात्मक होतं तितकंच मजेशीरदेखील होतं आणि त्यातून भरपूर काही शिकायलाही मिळालं. हे सगळं होऊ शकलं ते ‘फेरारी की सवारी’ या सिनेमामुळे. ‘फेरारी की सवारी’चा अनुभव खरंच अद्भुत होता.

हा सिनेमा झाल्यानंतर माझं तिकडचं काम बघून तिकडचे एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर यांनी म्हणजेच बिमल ओबेरॉय सर यांनी मला एका पपेट शोसाठी असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करशील का विचारलं. करिअरच्या सुरुवातीला कास्टिंगचा अनुभव जसा माझ्यासाठी वेगळा आणि नवीन होता तसाच पुन्हा एकदा पपेट शो हा प्रकारही माझ्यासाठी नवीनच होता. पपेट शो म्हणजे बोलक्या बाहुल्यांचा खेळ. आजपर्यंत अशा प्रकारे बोलक्या बाहुल्यांचा खेळ फक्त टीव्हीवर बघितला होता; पण आता तो प्रत्यक्षात बघायला मिळणार होता. शिवाय याचं तंत्रही वेगळं होतं सिनेमापेक्षा. मी बिमल सरांना लगेचच त्या पपेट शोसाठी माझा होकार कळवला.

हा पपेट शो लंडनवरून आला होता. या शोमध्ये आम्ही पहिल्यांदा एक वेगळं तंत्र वापरलं होतं; ते म्हणजे पपेट शोला नेहमी माणसांच्या कमरेएवढे कटआऊट्स असतात आणि त्याच्या मागे माणसं बसून पपेट्स हाताळत असतात; पण आम्ही पहिल्यांदाच माणसांच्या उंचीएवढे कटआऊट्स वापरले, जेणेकरून पडद्यामागचे कलाकार सहजपणे वावरू शकतील. माझ्यासाठी हा सगळाच अनुभव अतिशय वेगळा आणि नवीन होता, कारण आत्तापर्यंत फक्त आपल्या आजूबाजूच्या माणसांशी संपर्क साधून त्यांना कास्ट केलं होतं; पण आता पहिल्यांदाच निर्जीव पात्रांशी संबंध येत होता. त्याशिवाय आजपर्यंत सिनेमाच्या शूटिंगला असणारा एक कॅमेरा आणि पपेट शोसाठी आठ कॅमेरे आणि आठ स्क्रीन होते. या एवढय़ा मोठय़ा सेटअपमध्ये काम करायची माझी पहिलीच वेळ होती.

आमचे मुख्य दिग्दर्शक त्या आठ स्क्रीनसमोर बसलेले असायचे आणि मी असोसिएट असल्यामुळे मला सेटवर थांबून कलाकारांना सूचना द्याव्या लागायच्या. या पपेट्सची एक गोष्ट सतत सांभाळावी लागायची; ती म्हणजे पपेट्स फरचे असल्यामुळे ते फारच नाजूक होते. त्यांना सतत एसीमध्ये ठेवावं लागायचं आणि सॅनिटायझरने हात धुतल्याशिवाय ते हातात घालता येणं शक्य नसायचं. या पपेट शोचे आम्ही १५० प्रयोग केले. या पपेट शोनंतर माझ्याकडे पुढचं प्रोजेक्ट आलं ते एका सिनेमाचं कािस्टग आणि तो सिनेमा होता- ‘वेलकम टू कराची’.

हा सिनेमा माझ्याकडे आला तेव्हा साधारण सगळ्यांना एक प्रश्न पडला होता, की हा मराठी माणूस आणि याला फक्त मराठी कलाकार माहीत असतील किंवा फार तर फार दिल्लीतले कलाकार माहीत असतील. मग हा आपली फिल्म कशी करणार? त्यात बऱ्याच व्यक्तिरेखा पाकिस्तानी आहेत तसे चेहरे मला कसे माहीत असतील, अशीही त्यांना शंका होती; पण ज्यांनी माझं नाव सुचवलं होतं त्यांनी सगळ्यांना फक्त इतकंच सांगितलं होतं की, तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. माझ्या इतर प्रोजेक्टप्रमाणे हा प्रोजेक्टसुद्धा तितकाच आव्हानात्मक होता, कारण मला पाकिस्तानी चेहरे तर शोधायचे होतेच, पण त्याचबरोबरीने ज्यांना पश्तू भाषा बोलता येते, अशा कलाकारांना शोधायचं होतं. सिनेमाची ती गरजच होती; पण ही जबाबदारीसुद्धा मला पेलता आली आणि मी तसे कलाकार शोधले. भारतात त्याचं शूटिंग होणं शक्य नव्हतं म्हणून या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं. ‘वेलकम टू कराची’ या सिनेमाच्या कािस्टगचंदेखील खूप कौतुक झालं होतं.
आपल्या कामाची दखल घेतली, की पुढच्या कामांसाठी प्रोत्साहन मिळतं, याची मला सतत प्रचीती येत होती. वेगवेगळ्या कामांचं आव्हान, त्यासाठी घेतलेली मेहनत, त्याचा अभ्यास, प्रयोग या सगळ्यामुळे त्या-त्या कामातून मी नेहमी शिकत गेलो. मी केलेल्या प्रत्येक प्रोजेक्ट्ने मला नेहमीच काही ना काही शिकवण दिली आहे.

सौजन्य : लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com