गेल्या वर्षी शेवटच्या महिन्यात सुरू झालेल्या गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी शोजच्या रांगेत आता स्टार प्लसच्या ‘दिल है हिंदुस्तानी’ या नव्याकोऱ्या शोची भर पडली आहे. या शोच्या फॉरमॅटविषयी उत्सुकता होती. या शोचा पहिला एपिसोड झाला आणि एका ग्लॅमरस शोचं दर्शन झालं. चकचकीत मंच, आकर्षक रूप, रोमांचकारी मांडणी या सगळ्यामुळे या कार्यक्रमाची दखल घ्यावीच लागली.

जगभरातील विविध देशांतून अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा यात समावेश असल्यामुळे या शोचं ग्लॅमरस असणं तर आवश्यकच हवं. शर्यतीत राहायचं तर झ्ॉकपॅक सादरीकरण मस्टच आहे. पण ‘दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमाला आतंरराष्ट्रीय दर्जा असल्यामुळे त्याचा ग्लॅमरसपणा थोडा वरचढ ठरतो. मुख्य मुद्दा स्पर्धकांचा आहे. इथे आतंरराष्ट्रीय स्पर्धकांचं प्रचंड कौतुक केलं जातं. भारतीय संगीताविषयीचं त्यांचं प्रेम बघून ते करावंही. पण त्या सगळ्यांचीच गायकी उत्कृष्ट असतेच असं नाही. या कार्यक्रमात बहुतांशी स्पर्धकांना ते किती छान गायले अशा प्रतिक्रियाच मिळतात. दुसरा मुद्दा असा की, कार्यक्रमाचं नरेशन चालू असतं तेव्हा करण जोहरने जगभरातून विविध देशांतून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धकांची निवड करून त्यांना या कार्यक्रमात आणलं आहे, असं वारंवार सांगितलं जातं. करण जोहर आणि गायकांची निवड? खरं तर इथेच विषय संपतो. पण त्याने निवडलेल्या काही स्पर्धकांमध्ये खरंच काही गुणी गायक होते. कोणामुळे का होईना चांगलं स्पर्धकांना ऐकायला मिळतंय हेही नसे थोडके!

करण जोहरसोबत शाल्मली खोलगडे, बादशाह आणि शेखर रवजियानी हेही परीक्षक आहेत. या तिघांचं संगीत क्षेत्रातलं योगदान उत्तम आहे. बादशाह जुन्या पिढीला फारसा रुचत नसला तरी योयो हनी सिंगपेक्षा तो बराच बरा आहे. शेखरने आजवर तयार केलेली गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. शाल्मली ही मराठमोळी मुलगी हिंदी इंडस्ट्रीत रुळली आहे. त्यामुळे हे तिघं परीक्षक असणं स्वाभाविक आहे. पण करण जोहर गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोचा परीक्षक ही गोष्ट काही पचत नाही. हा पहिला प्रसंग नाही. याआधीही त्याने नाचाचे, विविध कलांच्या रिअ‍ॅलिटी शोचा परीक्षक म्हणून भूमिका बजावली आहे. निर्माता, दिग्दर्शक, अँकर, कलाकार अशा अनेक भूमिकांमधून तो प्रेक्षकांसमोर येत असतो. त्याला मनोरंजन क्षेत्राचं तंत्र माहीत असतं म्हणून त्याला इतरही बाबींचं ज्ञान आहे, असा समज बहुधा चॅनलवाल्यांचा असावा आणि म्हणून तो परीक्षक बनला असावा. त्याला आता अशा प्रकारे विविध रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघायची सवय झाली आहे. आणि कदाचित तो पुढेही काही कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.

देशी-परदेशी असे दोन्ही स्पर्धक या कार्यक्रमात आहेत. काही परदेशी स्पर्धकांनी भारतीय संगीत सादर केलं. इथे कार्यक्रमाचं शीर्षक सार्थकी लागलं. इतके दिवस या कार्यक्रमात एकही अँकर नव्हता. परीक्षकच अँकरचीही भूमिका बजावत होते. आता मात्र या कार्यक्रमात दोन अँकर आले आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, साधारणपणे अशा कार्यक्रमांची ऑडिशनची फेरी अतिशय साधेपणाने होत असते. म्हणजे रॉ असते. तिथे मोठा मंच नसतो, गाणं सादर करायला काही मिनिटांची मर्यादा असते. पण इथे यापैकी काहीच नाही. स्पर्धकाला मोठय़ा मंचावर गाणं पूर्ण सादर करायला मिळतं. मुळात या कार्यक्रमाचे पहिले चार एपिसोड ऑडिशनचे वाटलेच नाहीत. त्या चार परीक्षकांच्या आधी वेगळ्या काहींनी स्पर्धकांची गाळणी करून मोजकेच स्पर्धक निवडले असतील आणि तेच प्रेक्षकांना कार्यक्रमांत दिसले. त्यामुळे ज्याप्रमाणे इतर कार्यक्रमांमध्ये रॉ ऑडिशन दिसते तशी ‘दिल है हिंदुस्तानी’मध्ये दिसली नाही.

एखाद्या स्पर्धकाचं गाणं सामान्य प्रेक्षकांना आवडलं नसलं किंवा खरंच तो स्पर्धक एखादं गाणं उत्तम गायला नसला तरी केवळ परीक्षकांच्या एकूणच व्यक्त होण्यामुळे प्रेक्षक प्रभावित होतात. परीक्षकांच्या डोळ्यात पाणी येणं, त्यांनी सारखं उभं राहणं, गाण्याच्या सुरुवातीपासूनच सारखी सारखी दाद देणं, प्रत्येक स्पर्धकाला जाऊन मिठय़ा मारणं हे सारं खटकतं. या सगळ्या प्रकारामुळे अमुक एखादा स्पर्धक फार आवडला नसला तरी तो चांगला गायला असेल असा प्रेक्षकांचा समज होतो.

या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ असं की, यात स्पर्धकांच्या संख्येवर कोणतंही बंधन नाही. स्पर्धक एकटे, डुएट, तिघं, ग्रुप्स असं कोणत्याही फॉर्ममध्ये गाऊ शकतात. ही या कार्यक्रमाची जमेची बाजू. म्हणूनच यात मैत्रिणी, आई-मुलगी, नवरा-बायको, छोटी मुलं, मित्रांचा ग्रुप, ऑर्केस्ट्रा असं कोणीही गाताना दिसतं. त्यामुळे इतर गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी शोपेक्षा तो या गोष्टीत काहीसा वेगळा ठरतो. काही खटकणाऱ्या गोष्टी या कार्यक्रमात असल्या तरी हा कार्यक्रम गाण्यांची ग्लॅमरस मेजवानी देतो हे नक्की! ही मेजवानी नवीन असल्यामुळे तिचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा