हृदयेश फेस्टिव्हलमध्ये गानसरस्वती किशोरी आमोणकरांचा स्वरसंवाद

गायला सुरुवात करण्यापूर्वी मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे..आपल्या आवडत्या गायिकेचे दिव्य स्वर काना-मनात साठविण्यासाठी जमलेल्या हजारो श्रोत्यांशी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी त्यांच्या नेहमीच्या थेट शैलीत असा संवाद साधला तेव्हा अवघ्या प्रेक्षागाराने जिवाचे कान केले.

वयोमानानुसार गाणे कमी होते की जास्त, हे मला ठाऊक नाही, मात्र शरीर आता तेवढे साथ देत नाही, हे खरे आहे. माझे गाणे ऐकण्यासाठी आपण अद्यापही एवढय़ा संख्येने येता याबद्दल मी आपली आभारी आहे. जे काही गाईन ते गोड मानून घ्या..
गानसरस्वतीच्या बहुप्रतीक्षित मफलीची सुरुवात अशा भावनात्मक समेवर सुरू झाली. मात्र, त्यानंतर सलग दोन तास या चतुरस्र गायिकेच्या स्वरसामर्थ्यांची रसिकांनी क्षणोक्षणी अनुभूती घेतली. विलेपाल्रे पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारपासून सुरू झालेल्या ‘लोकसत्ता’ प्रस्तुत हृदयेश फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवसाचे प्रमुख आकर्षण किशोरीताईंचे गाणेच होते. या ऐतिहासिक स्वरसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
किशोरीताईंनी रागेश्री या रागाद्वारे मफलीची सुरुवात केली. ८४ वर्षांच्या या गानसरस्वतीचा स्वर आजही तितकाच अचूक व खणखणीत लागतो, याचा प्रत्यय रसिकांना आला. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), मििलद रायकर (व्हायोलिन), तेजश्री आमोणकर व नंदिनी बेडेकर (तानपुरा) यांनी त्यांना नेहमीप्रमाणे उत्तम साथ केली. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व आजचे आघाडीचे संतूरवादक राहुल शर्मा यांनी भूप राग सादर करून वातावरणनिर्मिती केली. हृदयेश आर्ट्सचे प्रमुख अविनाश प्रभावळकर यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकर व पं. शर्मा यांचा सत्कार केला.

सुगम संगीत सगळेच गातात
काहीतरी लाईट गा, अशी फर्माइश काही प्रेक्षकांकडून आल्यानंतर सुगम संगीत सगळेच गातात, तुम्हीही गात असाल. मी ते गात नाही म्हणून काही बिघडत नाही. आपले शास्त्रीय संगीत दैवी आहे, ते ऐका.. असे शाब्दिक फटकारे किशोरीताईंनी मारले.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी रागेश्री राग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.