* येत्या रविवारी डोंबिवलीत शुभारंभाचे प्रयोग *  महेश मांजरेकर यांची निर्मिती

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत (२०१७) सादर झालेली ‘ओवी’ ही एकांकिका आता व्यावसायिक रंगभूमीवर दोन अंकी नाटक म्हणून सादर होत आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने याची निर्मिती केली असून येत्या २५ मार्च रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात नाटकाचे शुभारंभाचे दोन प्रयोग होणार आहेत. गौरी इंगवले आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या नाटकात मुख्य भूमिका आहेत.

साठय़े महाविद्यालयाच्या सचिन, अनिकेत लिखित आणि अनिकेत पाटील दिग्दर्शित ‘ओवी’ या एकांकिकेने ‘लोकसत्ता लोकांकिका’सह अन्य एकांकिका स्पर्धात आपली छाप पाडली होती. ‘ओवी’च्या व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शनही अनिकेत पाटील यांनी केले आहे.

अनिकेत पाटील याच्या डोक्यात एक आगळीवेगळी कल्पना आली आणि त्यातून एका वेगळ्या विषयावरील ‘ओवी’ ही भन्नाट आणि थरारक एकांकिका तयार झाली. एकांकिकेत पाटील यांनी वेगवेगळे प्रयोग केले  होते.

‘ओवी’ पाहिल्यानंतर रहस्यमय थरार (हॉरर जॉनर) नाटक पाहिल्याचा एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ आणि अन्य स्पर्धामधून ‘ओवी’ सादर झाल्यानंतर ही एकांकिका चर्चेत आली. महेश मांजरेकर यांनी स्वत:हून ‘ओवी’ची दखल घेऊन एकांकिकेची ध्वनिचित्रफीत पाहिली आणि ही एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर सादर करायची, असे ठरविले. व्यावसायिक रंगमंचावर नाटक म्हणून सादर करताना मांजरेकर यांनी कुठेही हात आखडता घेतला नसल्याचे मूळ एकांकिकेचे आणि आता व्यावसायिक नाटकाचेही दिग्दर्शन करणाऱ्या अनिकेत पाटील यांनी ‘लोकसत्ता मुंबई’ला सांगितले.

नूपुर दुदवडकर, भाग्यश्री पाणे यांच्याही भूमिका असून रुईया महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींचाही कलाकार म्हणून या नाटकात सहभाग आहे. मूळ एकांकिकेसाठी पडद्यामागे (बॅक स्टेज) काम करणारा जो चमू होता तोच चमू व्यावसायिक नाटकासाठीही काम करणार असल्याचे पाटील म्हणाले.

‘प्रयोगोत्सव’ या निवडक एकांकिका महोत्सवामध्येही ‘झिरो बजेट’निर्मित ‘ओवी’ ही एकांकिका सादर झाली होती. थरारक आणि रहस्यमय अनुभव ही एकांकिका पाहताना प्रेक्षकांना येणार आहे. दुपारी साडेचार आणि रात्री साडेआठ वाजता नाटकाचे दोन प्रयोग डोंबिवलीत होणार आहेत. भीती म्हणजे आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे असून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते या भीतीच्या पलीकडे आहे, असे ‘ओवी’तून वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.