नाटक-चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांतील लोकप्रिय, समर्थ अभिनेता म्हणून सुबोध भावे आज सगळ्यांना परिचित आहे. पण प्रत्येक यशाची सुरुवात ही अपयशापासून होत असते. सुबोधनेही हा अपयशाचा पहिला डोस महाविद्यालयीन वर्षांतच पचवला. त्यामुळेच की काय अपयशाची भीती न बाळगता सातत्याने परिश्रम घेऊन के लेला प्रवास आज त्याला कशा पद्धतीने या यशापर्यंत घेऊन आला याबद्दल सुबोधने ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादातून सविस्तर गप्पा मारल्या.

कुठल्याही क्षेत्रातील प्रवासाची आपली एक सुरुवात असते. सुरुवातीचे कुतूहल ओसरते, आपण त्या प्रवासाचा एक भाग होतो मात्र पुढे जाताना या प्रवासाचं उद्दिष्ट काय, आपण नेमकं  काय करत आहोत, याचं परीक्षण सातत्याने करत राहणं आणि त्यानुसार मेहनतीने स्वत:त सुधारणा करत राहणं ही आपली यशाची व्याख्या आहे, असं सुबोध भावेसारखा आज घराघरांत प्रसिद्ध असलेला अभिनेता सांगतो. तेव्हा आपल्या कलेक डे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे हे निश्चितपणे जाणवल्याशिवाय राहत नाही. अभिनय हीसुद्धा एक सेवा आहे, कलेशी समर्पित अशा सेवावृत्तीनेच तो करायला हवा, ही दृष्टी आपल्याला पंडित अभिषेकी बुवा, उस्ताद अमीर खान यांच्यासारख्या प्रतिभावंतांकडून मिळाली, असे सुबोधने ‘सहज बोलता बोलता’ सांगितले. बारावीत विज्ञान शाखेत असताना तीन विषय राहिले. पुढे याच पद्धतीने विज्ञान घेऊन अभ्यास करत राहिलो तर अपयशाची माळ वाढत जाईल हे लक्षात घेऊन त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मग पुढे सिम्बॉयसिस महाविद्यालयात झालेला प्रवेश आणि तिथे नाटकाशी जुळलेल्या तारा त्याला या क्षेत्रापर्यंत घेऊन आल्याचेही तो म्हणाला. मात्र त्याही काळात नाटकाचा एक ग्रुप तयार झाला आणि त्याअंतर्गत एकांकिकांचे प्रयोग-दौरे सगळं सुरू झालं तरी आर्थिक गणित सोडवण्यासाठी त्या काळात वेगवेगळ्या नोकऱ्या के ल्या. शेवटच्या नोकरीच्या काळात मात्र नाटकाबद्दलची ही अस्वस्थता प्रकर्षांने जाणवली. कार्यालयात काम करत असताना गुदमरायला व्हायचं. आणि नाटकात काम करत असताना हातात एक पैसाही नव्हता, पण मन आनंदी असायचं. मग पूर्ण वेळ या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यावर पुढचे कोही महिने बेकार होतो. पुण्यात अगदी छोटी-मोठी कामं सुरू केली. आनंद माडगूळकरांच्या ‘गीत रामायण’मध्ये रामाची भूमिका के ली. स्मिता तळवलकरांच्या ‘पेशवाई’त काम केलं. पण या क्षेत्रात पुढे जायचं तर मुंबईत यावं लागणार हे कळून चुकलं होतं. तोवर बरोबरची लोके श गुप्ते, प्रसाद ओक, उपेंद्र लिमये ही मित्रमंडळी मुंबईत येऊन स्थिरावली होती. एकदा उपेंद्रनेच ‘आभाळमाया’साठी कास्टिंग सुरू असल्याची माहिती दिली. मी लगोलग ऑडिशन दिली आणि त्या मालिके त काम मिळालं. मग मुंबईतच ‘कळा या लागल्या जीवा’ हे नाटक मिळालं आणि पुणे-मुंबई हा रोजचा प्रवास थांबला, असं सुबोधने सांगितलं

कष्टाला पर्याय नाही

माझ्यासाठी माझ्यात झालेली सुधारणा हे माझं यश आहे आणि एकाच विचारात अडकू न पडणं हे माझं अपयश आहे. इतर यशापयशाच्या भ्रामक कल्पनांमध्ये अडकू न पडता कामा नये. आज माझा प्रयोग रंगला नाही, उद्या रंगेल या आत्मविश्वासाने मी आणखी मेहनतीने काम के लं पाहिजे. माझ्या मनाशी प्रामाणिक राहत मी कालच्यापेक्षा आज चांगलं काम करतो आहे, हे महत्त्वाचं आहे. कु ठल्याही क्षेत्रात जा.. कष्टाला पर्याय नाही.

टीव्हीवरचे कार्टून बालनाटय़ात कशाला?

लहान मुलांना सध्या गोष्टी सांगणारं क ोणीच नाही. आपण त्यांना घरात टीव्हीवर कार्टून लावून देतो, त्यामुळे त्यांना दृश्य माध्यमाचीच सवय लागते आहे. कल्पनेतून दृश्य उभी करण्याची त्यांची क्षमताच त्यामुळे हरवत चालली आहे. जे कार्टून्स ते टीव्हीवर बघतात त्याच व्यक्तिरेखांवर आधारित ‘डोरेमॉनच्या जंगलात’  वगैरे अशी बालनाटय़े आपण त्यांना देतो. तो ‘डोरेमॉन’, ‘छोटा भीम’ मुलांनी आधीच टीव्हीवर पाहिला आहे त्याला पुन्हा नाटकात आणून आपण मुलांना काय देतो? त्याऐवजी मतकरींची नाटकं  आता जी चिन्मयने के ली ती जास्त महत्त्वाची आहेत. मुलांच्या विश्वात डोकावून इथल्या मातीच्या गोष्टी, व्यक्तिरेखा त्यांना दिल्या पाहिजेत. नाटक या माध्यमाची ताकद ओळखून आपण मुलांसाठी दर्जेदार निर्मिती के ली पाहिजे. याच उद्देशाने मी ‘सुबोधदादाच्या गोष्टी’ हा उपक्रम सुरू के ला. यात मी त्यांना गोष्टी सांगून त्यावर चित्रंही काढायला सांगतो. एका कलेतून दुसरी कला शिकण्याची ही प्रक्रिया आहे. लवकरच बडबडगीतांवरही उपक्रम घेणार आहे.

‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट नाटकावर आधारित नाही

‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकाच्या तालमी करत असतानाच हा चित्रपटाचा विषय आहे, तो चुकू न नाटकातून मांडला गेला आहे अशी माझी धारणा झाली होती. ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकात दोन गायकांचा संघर्ष असल्याने त्या ओघाने गाणी आली होती. मात्र संगीत नाटकाप्रमाणे त्यातील गाणी कथेला पुढे नेणारी नव्हती. पंडित वसंतराव देशपांडे नेहमी म्हणत असत की संगीत नाटकं  दोनच एक ‘घाशीराम कोतवाल’ आणि दुसरं ‘संगीत सौभद्र’. ज्या नाटकाचा विषय त्यातील गाण्यातून पुढे सरकतो, कथेला गती येते ते संगीत नाटक. मला या सगळ्या गोष्टी नाटकात खटकत होत्या. सिनेमा करताना मी दारव्हेकरांच्या मूळ नाटकात बदल करू शकत नव्हतो. त्यामुळे मी नाटकावर चित्रपट के ला नाही तर या नाटकातील जी मूळ गोष्ट आहे त्यावर हा चित्रपट के ला. सिनेमात प्रत्येक गाण्यात काहीतरी घडलं पाहिजे, गोष्ट पुढे सरकली पाहिजे ही काळजी मी घेतली. या चित्रपटाचं कास्टिंग, लेखक आणि टीम मनासारखी जुळून आली. या सिनेमामुळे लहान मुलांचीही नाळ पुन्हा नाटय़संगीताशी जोडली गेली याचा मला जास्त आनंद आहे.

बालगंधर्वाची सात्त्विकता जपता येईल का?

‘बालगंधर्व’ चित्रपट करताना मला कोणतंही दडपण नव्हतं. कारण माझी भूमिका चांगली व्हावी आणि माझं कौतुक व्हावं असा माझा कोणताच हेतू या चित्रपटामागे नव्हता. मला फक्त बालगंधर्वाचं चरित्र लोकापर्यंत पोहोचवायचं होतं. मला एकाच गोष्टीची चिंता होती की बालगंधर्व ज्या शालीनतेने, सात्त्विकतेने स्त्री भूमिका रंगवत असत ती सात्त्विकता मला जमेल का? मी साकारत असलेल्या स्त्री भूमिकांमध्ये थोडं जरी कमी-जास्त झालं असतं तर पडद्यावर ते बीभत्स दिसलं असतं आणि त्यांच्याविषयी चुकीची भावना लोकांपर्यंत गेली असती. त्यामुळे ते दडपण माझ्यावर जास्त होतं.

..आणि अप्रतिम कलाकृती माझ्याकडून घडल्या

कलेच्या आणि तेही अभिनयाच्या क्षेत्रात इतकं  विलक्षण व्यक्तिमत्त्व असू शकतं यावर मााझा विश्वासच बसत नव्हता. काहीही झालं तरी बालगंधर्वाचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या निर्धाराने मी बालगंधर्वाविषयी वाचायला सुरुवात के ली. मग मी अभिराम भडकमकरची भेट घेतली. आम्ही दोघांनी मिळून काम सुरू के लं. तोवर या चित्रपटासाठी निर्माता-दिग्दर्शक कोणीच ठरलं नव्हतं. मी स्वत:च बालगंधर्व म्हणून ऑडिशन दिली कारण दुसरं कोणीच नव्हतं. ऑडिशन आणि कथा घेऊन आम्ही नितीन चंद्रकांत देसाई यांची भेट घेतली, त्यांनी कथा ऐकली आणि ते म्हणाले चला काम सुरू करूयात. माझं बालगंधर्वाचं काम पाहून शरद पोंक्षेंनी मला टिळकांवरचं ‘दुर्दम्य’ हे पुस्तक वाचायला दिलं. तेव्हाही मी टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाने असाच भारावून गेलो आणि पुढचं काम सुरू झालं. ‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट करायचा विचार ते नाटक करत असल्यापासूनच मनात होता. मला स्वत:ला परीकथा आवडतात. आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकात दोन गायकांचा संघर्ष यापलीकडेही वेगळी कथा मला दिसत होती. ती पडद्यावर आणण्याचा मी प्रयत्न के ला.

चरित्रपटात काम करायचे नाही, असा निर्णय घेतला आणि त्याच वेळी मला अभिजीत देशपांडे नावाचा वेडा माणूस भेटला. त्याने माझ्याकडून डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका करून घेतली. २०१० नंतरच्या पाच वर्षांत इतक्या चांगल्या कलाकृती, चांगलं काम माझ्याकडून घडलं यावर विश्वासच बसत नाही.