करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीचे पडसाद सर्वच क्षेत्रांवर उमटले. या काळात देशाचे अर्थचक्र थांबल्याने अनेक महत्त्वाचे व्यवसाय ठप्प होते. आता काही महिने करोना आपली पाठ काही सोडणार नाही हे मनाशी पक्के झाल्याने तरुणांनी करोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर सदुपयोग केला. काहींनी कामामुळे राहिलेले आवड आणि छंद जोपासले. तर काहींनी समाजमाध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करत तेथे गप्पांचे फड रंगवले. असाच मिळालेला वेळ सत्कारणी लावत नाशिक येथील ‘ग्रॉस डोमेस्टीक हॅपीनेस’  संस्थेतर्फे ‘उद्या – लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सद्य परिस्थतीवर भाष्य करणाऱ्या ‘उद्या’ या चित्रपटाचे लेखन राहुल बनसोडे यांनी केले आहे. एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर दोन देशांत राहणाऱ्या व्यक्तींची कथा यात मांडण्यात आली आहे. श्रुती मधुदीप, धीरज कुलकर्णी यांनी यात प्रमुख भूमिका साकारली असून संगीत स्वप्निल कुलकर्णी यांनी दिले आहे. या चित्रपटाच्या कथेपासून ते चित्रीकरणापर्यंत सर्व कामे घरातूनच करण्यात आली आहेत. या चित्रपटात न्यूयॉर्क आणि पुणे या शहरातील करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा ७ ऑगस्ट रोजी समाजमाध्यमावर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांना youtu.be/Ojs2iF6l80E या लिंकवर पाहता येईल.

शेतक ऱ्यांचे विश्व मांडणारा ‘कोंदण’

करोनामुळे देशातील चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक हिंदी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. याच पावलावर पाऊल ठेवत सांगली येथील सचिन यादव दिग्दर्शित ‘कोंदण’ हा मराठी चित्रपट  www.cinemapreneur.com  या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  सचिन यादव दिग्दर्शित ‘कोंदण’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवरून प्रेरित आहे. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याची बायको दोन लहान मुलांना घेऊन एकटी समर्थपणे जीवनात येणाऱ्या संकटे आणि आव्हानांना कशी परतवून लावते याची ही कथा आहे. या कथेत कृष्णा पवार हा शेतकरी दुष्काळ आणि कर्ज न फेडल्यामुळे आत्महत्या करतो. कृष्णाच्या आत्महत्येनंतर सरकारकडून मिळणारे अनुदान भ्रष्ट अधिकारी लूटतात, आणि त्याच्या बायको(रुक्मिणी)ची फसवणूक करतात. तिथून तिच्या आयुष्याला कशी संघर्षमय कलाटणी मिळते आणि एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात होते. संपूर्ण माळरानावर एकटी रुक्मिणी मुलांचा सांभाळ करत शेती करते. तिचा हा प्रवास चित्रपटातून पाहता येणार आहे. या चित्रपटात समीक्षा कदम, विक्रांत केदारे, सतीश निकम, बालकलाकार गुरुनाथ हिंदळेकर आणि नागेवाडी गावातील इतर कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाला पाश्र्वसंगीत चिराग सोनी व राजेंद्र साळुंके यांनी दिले आहे. ‘नाटय़वेद आर्टस्’ या संस्थतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून ‘डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाऊंडेशन’ आणि ‘उत्तुंग थिएटर्स’ यांचे सहकार्य लाभले आहे.