चांगले काम कुठे नि कसे उपयोगी पडेल काही सांगता येत नाही (म्हणूनच कामाचा दर्जा सतत उंचावत ठेवायचा असतो.) गीतकार गुरू ठाकूरबाबत अगदी हेच झाले. ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटाच्या निर्मितीची जुळवाजुळव सुरू असताना निर्माती रेणु देसाई गीतकार आणि संगीतकार यांच्या निवडीबाबत विशेष चाखंदळ होती. संगीतकार निलेश मोहरीर याची निवड तिने केली आणि जेव्हा गीतकाराची निवड करायची वेळ आली तेव्हा तिला ‘नटरंग’ची गाणी आठवत होती. ‘नटरंगच्या’च गीतकाराला निवडायचे तिने निश्चित केले, पण गुरू ठाकूर म्हटल्यावर कोणी तरी गंभीर व्यक्तिमत्वाचा माणूस भेटेल आणि त्याच्याकडून तरुण गाणी करवून घेणे कसोटीचे ठरेल असे तिला वाटले. स्वत: फोन करुनच तिने गुरूला भेटायला बोलावले. प्रत्यक्षात त्याचे तरुण रुप, गीत रचनेतील उत्साह आणि प्रसंगानुसार गाणे रचण्याची कला हे सगळं पाहून निर्माती रेणु देसाई प्रचंड सुखावली. मंगलाष्टकाच्या ध्वनिफित प्रकाशन सोहळ्यात तिने आपले असे अनुभव खूप रंगवून सांगितले. (म्हणूनच तर लांबलेला सोहळा सुखद ठरला.)