बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या पोस्टवरुन सध्या वाद सुरु असून रिचाने पहिल्यांदाच या प्रकरणावर मौन सोडलं आहे. तसंच ही चूक नकळपणे घडली असं स्पष्टीकरणदेखील तिने दिलं आहे. रिचाने एक पोस्ट शेअर करत जाहीरपणे माफी मागितली आहे.

रिचाच्या ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटाचं ५ जानेवारीला एक पोस्ट प्रदर्शित करण्यात आलं होतं. यात रिचाच्या हातात झाडू दाखवण्यात आला होता. तर त्या फोटोवर ‘अनटचेबल, अनस्टॉपेबल’ असं लिहिण्यात आलं होतं. हा मजकूर वाचल्यानंतर सोशल मीडियावर या पोस्टरवर, रिचा आणि निर्मात्यांवर अनेकांनी कडाडून टीका केली. त्यानंतर आता रिचाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.


“या चित्रपटात काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता. यातून मला बरंच काही शिकता आलं. चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आणि त्याच्यावर कडाडून टीका झाली. पण काही गोष्ट योग्य असल्यामुळेच ही टीका सहन करावी लागली”, असं रिचा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “नकळतपणे आमच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव झाल्यावर आम्ही दुसऱ्याच दिवशी एक नवीन पोस्टर तयार केलं. हे खरंच अत्यंत चुकीचं होतं आणि आमच्याकडून नकळतपणे झालं होतं. कोणीही मुद्दाम किंवा जाणूनबुजून हे करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे झालेल्या प्रकारावरुन सगळ्यांची क्षमा मागते.”

या चित्रपटात रिचा मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष कपूर करणार आहेत. त्यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात रिचा चड्ढासोबतच मानव कौल आणि सौरभ शुक्ला मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २२ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.