28 May 2020

News Flash

‘सतत यशाचा विचार अभिनयावर परिणाम करतो’

रघू ही भूमिका पडद्यावर निभावण्यासाठी गुजराती व्यापाऱ्याची जीवनशैली, बोलणे, वागण्याची पद्धती याचा अभ्यास केला

(संग्रहित छायाचित्र)

‘काय पोचे ’, ‘शाहीद’, ‘ट्रॅप्ड’ अशा वेगळ्या चित्रपटांमधून अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता राजकुमार राव ‘मेड इन चायना’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात तो धडपडय़ा गुजराती व्यावसायिक रघू मेहता याच्या भूमिकेत आहे. चीनमधील उत्पादनं भारतात विकून यशस्वी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या रघूची भूमिका ही रंजकही आहे आणि हटकेही आहे, असे तो म्हणतो. गेल्या काही वर्षांत राजकुमारने सातत्याने वेगवेगळ्या भूमिका आणि लुकमधून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट मोठा आहे की छोटा आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे की नाही हे पाहण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची धडपड त्याला वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आणते. ‘मेड इन चायना’ही असाच प्रयत्न असल्याचे त्याने स्पष्ट केले.

रघू ही भूमिका पडद्यावर निभावण्यासाठी गुजराती व्यापाऱ्याची जीवनशैली, बोलणे, वागण्याची पद्धती याचा अभ्यास केला. मी दिग्दर्शक मिखिल मुसळे यांच्याबरोबर अहमदाबाद येथे जाऊन राहिलो होतो.  गुजराती लोकांबरोबर वेळ घालवला. त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे तेथील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण, तिथल्या समस्या चांगल्या रीतीने समजण्यास मदत झाली, असं तो म्हणतो. या भूमिकेसाठी त्याला आठ किलो वजन वाढवावे लागले. प्रत्येक चित्रपटातील त्याची भूमिका ही वेगळी असल्याने तो भूमिकेनुसार कायम स्वत:त बदल घडवत त्यासाठी मेहनत घेताना दिसतो. ‘ट्रॅप्ड’ चित्रपट साकारताना मला एकाच जागेत अडकल्यामुळे बारीक दिसणे अपेक्षित होते. त्यासाठी मी अनेक दिवस जेवण टाळले होते, असेही तो सांगतो.

बॉलीवूडमध्ये सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या राजकुमारचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. याचे कारण या मुंबापुरीत आल्यावर चित्रपट मिळवण्यासाठी के लेल्या संघर्षांची त्याला जाणीव आहे. पुण्यातील एफटीआयमधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यावर राजकुमार मुंबईला आला. ‘लव्ह सेक्स और धोका’ हा पदार्पणाचा चित्रपट मिळेपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. याआधी मी अनेक चित्रपट, जाहिरातींसाठी ऑडिशन दिली होती. चित्रपटासाठी योग्य चेहरा नसल्याने अनेक ठिकाणी नकारही पदरात पडला. परंतु अपयशाने खचून न जाता मनापासून मी प्रयत्न सुरू ठेवले. आजच्या नवोदित कलाकारांना लगेच प्रसिद्धी आणि यश पाहिजे असते. मात्र त्यांची मेहनत करण्याची तयारी नसते. करिअरच्या सुरुवातीला येणाऱ्या अपयशाने ते खचून जातात. मेहनत, सातत्य आणि संयम ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

आधीच्या आणि आताच्या राजकुमारमध्ये कमालीचा फरक झाला असल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘लव्ह सेक्स और धोका’ हा चित्रपट करताना मी अतिशय लाजाळू होतो. इतरांशी जास्त बोलत नव्हतो. हळूहळू मी माझी संवादकौशल्ये सुधारण्यावर भर दिला. यामध्ये त्याची प्रेयसी अभिनेत्री पत्रलेखाने आपल्याला खूप सहकार्य केले, असे तो सांगतो. आताचा राजकुमार हा खूप शांत आणि संयमी आहे, असे तो सांगतो.

‘मेड इन चायना’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित होत असताना तो थोडासा भावुक झाला होता. नुकतेच त्याच्या वडिलांचे निधन झाले. रुग्णालयात असताना त्यांनी या चित्रपटाची झलक पाहिली होती, अशी आठवण त्याने सांगितली. ‘रुहअफ्जा’ या चित्रपटाचे चित्रीकरण करताना वडिलांचे निधन झाले. एक दिवस वडिलांचे दर्शन घेऊन मी परत कामावर रुजू झालो. आपण नेहमीच कामाला प्राधान्य देतो असे सांगतो.

एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. माझ्याही यसात  आईचा आणि पत्रलेखाचा मोठा वाटा आहे. मी जेव्हा अभिनय करण्याचे ठरवले तेव्हा आईने मला भक्कम पाठिंबा दिला. मी आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या-वाईट गोष्टी आईला सांगत होतो, असेही त्याने सांगितले.

चित्रपट यशाचे रहस्य हे त्याने बॉक्स ऑफिसवर केलेल्या व्यवसायावर अवलंबून असते. एखाद्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर तो यशस्वी आणि कमी कमावले तर तो सपशेल आपटला असे म्हटले जाते. चित्रपटाचे यश यावरूनच अधोरेखित होते, हे तो मान्य करतो. मात्र बॉक्स ऑफिसवरील या यशापयशाच्या गणिताचा कलाकाराच्या कामगिरीवर काही परिणाम होतो का?,  याबद्दल त्याने सांगितले की हे प्रत्येक अभिनेत्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. माझ्या चित्रपटाने किती यश मिळवले याचा माझ्या अभिनयावर काही फरक पडत नाही, असे तो म्हणतो. चित्रपटाच्या यशाचा सतत विचार केल्यास कलाकार पडद्यावर चांगली भूमिका करू शकत नाही, असे आपले स्पष्ट मत असल्याचे तो सांगतो. मात्र त्याच वेळी चित्रपट समीक्षक जे आपल्या कामाबद्दल टिप्पणी करतात ती महत्वाची असते आणि ती लक्षात घेऊ न कामात बदल करता येतात, असे त्याने सांगितले.

मराठमोळ्या मिखिल मुसळेचे हिंदीत पदार्पण

‘मेड इन चायना’ चित्रपटाचा दिग्दर्शक मिखिल मुसळे हा मूळचा मराठी आहे. त्याचे कुटुंब मुंबईचे असून कामानिमित्त गुजरातला स्थायिक झाले. आईवडील मराठी असल्याने मराठी समजत असल्याचे मिखिलने सांगितले. गिरीश कुलकर्णीचा ‘गाभ्रीचा पाऊ स’, राजेश मापुस्करचा ‘व्हेंटिलेटर’, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, ‘फँड्री’ हे त्याचे आवडीचे मराठी चित्रपट. भविष्यात मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळाल्यास आवडेल, असेही मत त्याने व्यक्त केले. मिखिलने दिग्दर्शित केलेल्या ‘राँग साइड राजू’ या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाची कथा कशी सुचली याबद्दल सांगताना, अमेरिकेमध्ये असलेल्या परिंदा जोशी हिने २०१५ मध्ये मला एका धडपडय़ा गुजराती व्यावसायिकाची गोष्ट सांगितली. ही गोष्ट आवडल्याने त्यावर चित्रपट करण्याचे ठरवले. यासाठी राजकुमार राव, बोमन इराणी आणि मौनी रॉय यांनी काम करण्यास होकार दर्शवल्याने हा चित्रपट आकारास आला असेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2019 1:53 am

Web Title: made in china rajkummar rao interview abn 97
Next Stories
1 चित्ररंग : आपापल्या अवकाशाची खुली कहाणी
2 भावभक्तीची भरकटलेली गोष्ट
3 नवं काही : रंगभूमीवर पुन्हा ‘बालगंधर्व’
Just Now!
X