लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर बंद ठेवल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भंडारकर मात्र भावूक झाले आहेत. गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन मंदिराबाहेरुन घेतले आहे.

काय म्हणाले मधुर भंडारकर?

“मी दर मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी जातो. मात्र गेल्या २५ वर्षात मी पहिल्यांदाच मी मंदिराबाहेरुन दर्शन घेतले आहे. परंतु करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे.” असे ट्विट मधुर भंडारकर यांनी केले आहे.

हिंदी सिनेसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक ही मधुर भांडारकर यांची ओळख आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.