करोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात प्रत्येक जण घरी राहून त्यांचे छंद जोपासत आहेत. यामध्येच अभिनेत्री माधुरी दीक्षितदेखील वेळेचा सदुपयोग करत आहे. लॉकडाउनमुळे सारं काही बंद असल्यामुळे घराबाहेर जाणं कोणत्याही नागरिकाला शक्य नाहीये. परंतु तरीदेखील माधुरी तिच्या डान्स क्लासला रोज हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे घराबाहेर न पडता ती डान्स क्लासला उपस्थिती लावत आहे.
माधुरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती डान्स क्लासला कशी उपस्थित राहते हे दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान विकसित झालं आहे. त्यामुळे आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो. याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माधुरी नृत्याचे धडे गिरवत आहे. माधुरी रोज व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तिच्या गुरुंशी संवाद साधते आणि नृत्याचं प्रशिक्षण घेते. या व्हिडीओ कॉलचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कथ्थक शिकताना दिसत आहे. तिचे गुरु तबला वाजवतात आणि त्या तबल्याच्या तालावर माधुरी नृत्य करते. हा अमुल्य वेळ वाया न घालवता, त्याचा सदुपयोग करा. तुम्हा जी गोष्ट मनापासून करावीशी वाटते ती करा. मग तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही, असं कॅप्शन माधुरीने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, माधुरी एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे. तिच्या करिअरमधील अनेक चित्रपट खास तिच्या नृत्यामुळेच ओळखले जातात. विशेष म्हणजे माधुरीप्रमाणेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राची शाहदेखील तिच्या डान्स प्रॅक्टीसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.