ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं असून नवीन अद्ययावत स्टेडियमचं उद्घाटन मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या क्रिकेट लीगनं होणार आहे. एक ते तीन फेब्रुवारी या कालावधीत “महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लीग”चं आयोजन करण्यात आलं असून संजय जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश लिमये, उपेंद्र लिमये, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, विनय येडेकर, अतुल परचुरे, हृषीकेश जोशी, प्रथमेश परब, अनिकेत विश्वासराव, प्रविण तरडे, शरद केळकर, समीर धर्माधिकारी आदी जानेमाने कलाकार या स्पर्धेत क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

या स्पर्धेत ‘मुंबईचे मावळे’ – कर्णधार संजय जाधव, ‘बाणेदार ठाणे’ – कर्णधार अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ – कर्णधार सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ – कर्णधार महेश लिमये, ‘पराक्रमी पुणे’ – कर्णधार सौरभ गोखले आणि ‘लढवय्ये मीडिया’ – कर्णधार विनोद सातव असे सहा संघ खेळणार आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतेच स्पर्धेच्या ट्रॉफी आणि थीमसाँगचे अनावरण करण्यात आले. ‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे यंदा पहिलेच वर्ष आहे. स्पर्धेचे आयोजन ठाणे महापालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर, संदीप जुवाटकर यांनी केले असून डी. बी. एन्टरटेन्मेंटचे दिलीप भगत सहआयोजक आहेत. ठाणे महापालिकेचे शिक्षण सभापती विकास रेपाळे यांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी पुढाकार घेतला असून कलारसिकांची मांदियाळी असलेल्या ठाण्याचे सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे सांगितले तसेच महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ते म्हणाले.

ठाण्यात आयपीएल सराव?

मैदानाचा कायापालट

  • दादोजी कोंडदेव स्टेडियममधील क्रिकेट मैदानासाठी ७० मीटर परिघाची सीमारेषा आखण्यात आली आहे. ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपेक्षाही मोठे असल्याचा दावा क्रीडा प्रशासनाने केला आहे.
  • मैदानात ऑस्ट्रेलियातील बरमुडा गवताचे रोपण करण्यात आले आहे. मैदानात पाण्याची फवारणी करण्यासाठी आधी दहा माळी काम करत होते. मात्र, आता मैदानात ७२ भूमिगत फवारे बसविण्यात आले आहेत. पाण्याचा शिडकावा करायचा असेल तेव्हा ते जमिनीतून आपोआप वरती येतात. त्यामुळे पाण्याचाही अपव्यय टळतो.
  • एक मुख्य खेळपट्टी व सरावासाठी तीन खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य खेळपट्टीजवळ तिसऱ्या पंचांसाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
  • डिजिटल स्कोअर बोर्ड उभारणीचे काम शिल्लक आहे, अशी माहिती स्टेडियम प्रशासनाने दिली.