अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केल्याचं कारण सांगितलं जात असलं, तरी वेगवेगळे आरोप आणि तक्रारी यासंदर्भात आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युची चौकशी सध्या महाराष्ट्र पोलीस करत आहे. या प्रकरणाविषयी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘बीबीसी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील प्रश्नांसोबतच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरही महत्त्वाची माहिती दिली. देशमुख म्हणाले,”या प्रकरणात सविस्तर चौकशी सुरू आहे. गेल्या ८ दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. ज्यांना ज्यांना बोलवायचं आहे, त्यांना बोलावून चौकशी सुरू आहे. आमच्याकडे व्यावसायिक दुष्मनीतून त्यानं आत्महत्या केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पद्धतीनं पोलीस खातं तपास करत आहे. अनेकांना बोलावून त्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले आहेत,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.

मी नावं सांगणार नाही, पण…

या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले,”मी नावं इथं आपल्याला सांगणार नाही, पण अनेक नावं समोर आली आहेत. ज्यांचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना बोलावलं जाईल. त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल. त्याने खरंच व्यावसायिक दुष्मनीतून आत्महत्या केली का? याची चौकशी सुरू आहे. जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत सांगणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात,” असंही देशमुख म्हणाले.