प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार. वर्षांकाठी येणाऱ्या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा हा सन्मान सोहळा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. रसिक प्रेक्षकांना आपल्या मतांचा कौल देता यावा या हेतूने झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा आगळावेगळा सन्मान सोहळा गेल्या नऊ  वर्षांपासून आयोजित करत असून यंदा सोहळ्याचे दहावे वर्ष आहे. हा सोहळा  उद्या,  २८ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  या दिमाखदार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सर्वाचे लाडके अभिनेते वैभव तत्त्ववादी आणि अमेय वाघ यांनी सांभाळली. महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, मृणाल कुलकर्णी, संजय जाधव, प्रियदर्शन जाधव, सुमेध मुद्गलकर, जीतेंद्र जोशी, राजेश म्हापुसकर, भूषण प्रधान, मनवा नाईक या आणि अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी रेड कार्पेटवर त्यांच्या स्टाइलची झलक दाखवली.महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना मनोरंजित करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव याने तानाजी मालुसरे यांना मानवंदना देत बाहुबलीमधील सुप्रसिद्ध गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स केला. शरद केळकर याने बॉलिवूडच्या चार्टबस्टर गाण्यावर दमदार परफॉर्मन्स तर दिलाच पण त्यातून ‘से नो टु ड्रग्स’ हा सामाजिक संदेशही दिला.तर महेश मांजरेकर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सिनेकलाकारांवर त्यांच्या विशिष्ट शैलीत टिप्पणी केली.