निर्माता दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांचा आगामी ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १८ ऑक्टोबर असून त्याला अद्याप सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. सेन्सॉर बोर्डाने यातील एका वाक्यावर आक्षेप घेतला असून महेश मांजरेकर यांनी तो न बदलण्याची भूमिका घेतली आहे. याविरोधात आता ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम या दिग्गज कलावंतांच्या भूमिका आहेत. सेन्सॉरने प्रमाणपत्र द्यावं यासाठी निर्मात्यांकडून ५ सप्टेंबर रोजी पत्र पाठवण्यात आलं. मात्र त्यावर काहीच उत्तर मिळालं नाही. सेन्सॉरने आक्षेपार्ह म्हटलेलं वाक्य काढणार नाही असा पवित्रा निर्मात्यांनी घेतला आहे.

वाचा : आमिरचं सर्वांत मोठं स्वप्न अखेर झालं पूर्ण 

‘या चित्रपटात आक्षेपार्ह असं काहीच नाही. कायद्याचं उल्लंघन होईल असा कोणताच संवाद नाही. चित्रपटात जे काही संवाद आहेत, ते दाखवणं गरजेचं आहे,’ असं मत महेश मांजरेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडलं. त्यामुळे आता १८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार का, सेन्सॉरकडून त्याला हिरवा कंदील मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.